सखोल विश्लेषणासाठी पुस्तके, वर्तमानपत्रांसोबत नवमाध्यमांचाही आधार
‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषु’च्या ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत चुरशीची लढत देत सात विजेते स्पर्धक आता ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी सज्ज झालेले आहेत. विभागीय अंतिम फेरीतून राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत दाखल होण्यासाठी सातही वक्ते विभागीय अंतिम फेरीपूर्वी कसोशीने सराव करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
वर्तमानपत्रे, पुस्तके यासोबत सखोल विश्लेषणासाठी नवमाध्यमांचा आधार घेत परिपूर्ण अभ्यास करून त्याला वक्तृत्वशैलीची जोड देत सराव सुरू असल्याचे सातही स्पर्धकांकडून सांगण्यात आले आहे. तरुणांना व्यक्त होण्यासाठी त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता’ची ‘वक्ता दशसहस्रेषु’ची ठाणे विभागीय प्राथमिक फेरी विद्यार्थी वक्त्यांच्या भरघोस प्रतिसादात पार पडल्यानंतर अंतिम सात जणांची निवड ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी झाली. मात्र दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आणि अधिक चुरशीच्या होणाऱ्या ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी सातही विद्यार्थी वक्ते विविध प्रकारे सराव करत आहेत. वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने सामाजिक विषयांचा अभ्यास सुरू असल्याचे मुरबाड येथील जेएसएम महाविद्यालयात तृतीय वर्ष कला शाखेत शिकणारा महेश घावट याने सांगितले. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्रेषुची पूर्वीच्या स्पर्धाची भाषणे शोधून काढून त्यातील मुद्दे लिहून काढून आपल्याला काय बदल करायला हवेत याचा आढावा घेत असल्याचे महेश घावट याने सांगितले. वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सध्या चालू घडामोडींचे आकलन सुरू आहे. तसेच एखादा विषय निवडून त्यावर अभ्यास करून त्याचे विविध पैलू तपासून सादरीकरणाचा सराव सुरू असल्याचे ठाण्यातील बा.ना. बांदोडकर महाविद्यालयात प्रथम वर्ष सीएसच्या वर्गात शिकणाऱ्या अनिकेत पाळसे याने सांगितले. ‘लोकसत्ता’चे अग्रलेख वाचण्यावर अधिक भर देत असून, विषयांचे सादरीकरण चांगले होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेणे सुरू आहे. स्पर्धेचे विषय हे सामाजिक असून फक्त ते स्पर्धेपुरतेच मर्यादित न राहता वक्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे वसई येथील वर्तक महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या सुप्रिम मस्कर याने सांगितले. विषयांच्या अनुषंगाने पुस्तकवाचन, वर्तमानपत्रवाचन सुरू आहे. तसेच परीक्षकांनी सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवून त्या दिशेने सराव सुरू आहे. मित्रमैत्रिणी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाशी चर्चा करून या चर्चेतून येणारे मुद्दे स्पर्धेसाठी महत्त्वाचे ठरतील, असे पनवेल येथील वी. के. हायस्कूलमध्ये कला शाखेच्या ११वी वर्गात शिकणाऱ्या आम्रपाली सहजराव हिने सांगितले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि परराष्ट्र संबंधांचा अभ्यास वक्तृत्व स्पर्धेच्या दृष्टीने सुरू आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विविध विषयांचे वाचन होत असल्याचे जोशी बेडेकर महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या किमया तेंडुलकर हिने सांगितले. यापूर्वी झालेल्या स्पर्धामधील विषयांचा आणि वक्त्यांच्या मांडणीचा अभ्यासही सुरू असून प्रेक्षकांना विषय समजावून देण्याची कुवत वक्तृत्वशैलीत आणण्यासाठीचा प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई विद्यापीठ-ठाणे उपविभागाच्या तृतीय वर्ष विधि शाखेत शिकणाऱ्या अनुजा परुळेकर हिने सांगितले. चालू घडामोडींमधील एखादा विषय निवडून त्या विषयाचे विविध अर्थ समजावून घेऊन स्वत:चे मत बनवणे अशा प्रकारे सध्या स्पर्धेचा सराव सुरू असल्याचे बा.ना. बांदोडकर महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत शिकणाऱ्या राज खंडागळे याने सांगितले.
प्रायोजक
पितांबरी कंठवटी प्रस्तुत, लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेचे असोसिएट पार्टनर श्री धूतपापेश्वर आणि पुनीत बालन एंटरटेन्मेंट प्रा. लिमिटेड आहेत. या स्पर्धेचे पॉवर्ड बाय पार्टनर वास्तु रविराज, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि जनसेवा सहकारी बँक आहेत.
- कधी – मंगळवार, १२ मार्च, सायंकाळी ६ वाजता
- कुठे – पहिला मजला, सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी, ठाणे (प.)