संविधानात असलेली समानता प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करून वर्तमानात वर्तन केले तर आजचा वर्तमान इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल.. स्मार्टसिटीत राहणाऱ्या लोकांचे विचारही स्मार्ट असायला हवे. धर्मातून हिंसा व्हावी असे कोणताही धर्म सांगत नाही, त्यामुळे मानवतेचा धर्म समानतेचा संदेश देशात प्रस्थापित करेल आणि विधायक कार्याला बळ मिळेल.. सेल्फी आत्मपरीक्षण आणि स्वत:ची ओळख करून देणारा असावा. चुकांची पुनरावृत्ती न होऊ देणारा हा उद्याचा सेल्फी आजच्या सेल्फीपेक्षा कसा उत्कृष्ट असेल अशा विविध मुद्दय़ांना स्पर्श करत ‘लोकसत्ता’ वक्ता दशसहस्रेषु स्पर्धेच्या ठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांची वाट मोकळी केली. ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन शाळेत पार पडलेल्या ठाणे विभागाच्या पहिल्या फेरीत महाविद्यालयीन तरुण, तरुणींनी आपली उत्स्फूर्त मते मांडली.
ठाणे शहरासोबत पनवेल, गोवेली अशा विविध भागांतील ४० महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. प्राध्यापिका रेखा मैड आणि शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाच्या शिक्षिका विभावरी दामले यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. वक्तृत्व स्पर्धेत आशय आणि व्यासंग महत्त्वाचा असतो. विषयाचा सर्वसाकल्याने विचार करणे गरजेचे असते. वक्तृत्व स्पर्धेत नाटकासारखा अभिनय नसावा. वक्तृत्व हे एक शास्त्र आहे असे स्पर्धकांना मार्गदर्शन करत प्रा.रेखा मैड यांनी ‘लोकसत्ता’ने विद्यार्थ्यांना विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केले याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार मानले. ‘जनता सहकारी बँक’ पुणे आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ या स्पर्धेचे प्रायोजक असून सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलेपमेंट यांचे स्पर्धेस सहकार्य लाभले. युनिक अकॅडमी आणि स्टडी सर्कल या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.

ठाणे विभाग अंतिम फेरीसाठी निवड झालेले स्पर्धक
प्रज्ञा पोवळे – जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे<br />स्वानंद गांगल – व्ही.पी.एम. टीएमसी लॉ महाविद्यालय, ठाणे
राजश्री मंगनाईक – के.एल.ई. महाविद्यालय, कळंबोली
अविनाश कुमावत – सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर
रिद्धी म्हात्रे – पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स महाविद्यालय, पनवेल<br />नम्रता चव्हाण – बिर्ला महाविद्यालय, कल्याण<br />निवृत्ती गणपत – सोनुभाऊ बसवंत महाविद्यालय, शहापूर
राहुल धामणे – जीवनदीप शिक्षण संस्था गोवेली महाविद्यालय, कल्याण

Story img Loader