संदीप बर्वे, ठाणे

जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षित टाऊन हॉलचे नूतनीकरण करून ठाणेकरांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक उत्तम सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. मात्र कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की या टाऊन हॉलच्या सौंदर्याला सध्या एका कचराकुंडीचे गालबोट लागले आहे. टाऊन हॉलच्या आवारात उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. टाऊन हॉलमध्ये विविध कलावंतांच्या चित्रांचे प्रदर्शन भरते. निरनिराळी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे होतात. त्यामुळे येथे आता सातत्याने रसिकांचा राबता असतो. अनेक रसिक या दालनाची तुलना मुंबईतील जहांगिर कला दालनाशी करू लागले आहेत. अशा परिस्थितीत दर्शनी भागातच असणारी कचराकुंडी खटकते. जिल्हा प्रशासन अथवा महापालिका प्रशासनाने येथील कचराकुंडी इतरत्र हलवावी.

रस्त्यांची कामे सुरू;त्यातच फेरीवाल्यांची दाटी

रवींद्र चव्हाण, डोंबिवली

शहरात रस्त्याची कामे सुरूअसल्याने वाहतूक कोंडीत भर पडते असे म्हटले जाते. परंतु ही वाहतूक कोंडीची आणखीही काही कारणे आहेत. रस्त्यांची कामे सुरू आहेतच, परंतु तेथेच फेरीवाल्यांची गर्दी असते. वाहनांची वर्दळ, फेरीवाल्यांची गर्दी यामुळे या ठिकाणी सायंकाळी चालणेही कठीण होऊन बसले आहे.

डोंबिवलीत मुख्य रस्त्यांच्या सीमेंट काँक्रीटीकरणाची कामे सध्या सुरू आहेत. फडके रोडचे काम पूर्ण झाले असले तरी त्यालगत असलेल्या छोटय़ा रस्त्यांचे काम पालिकेने हाती घेतले आहे. येथे सध्या अंतर्गत जलवाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे येथे बॅरेक लावण्यात आले आहेत. रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यातच दुसऱ्या बाजूला सुरक्षिततेसाठी लावलेले हे बॅरेकेट्स आहेत. इतर वेळी रस्त्याच्या दुतर्फा बसणारे विक्रेते या बॅरेकेट्सच्या बाजूला आता अनधिकृतपणे व्यवसाय करण्यासाठी बसू लागले आहेत. यामुळे वाहनांना अनेकदा अडथळा निर्माण होत आहे. अर्धा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध असताना त्यातही या फेरीवाल्यांनी जागा अडविल्याने पादचाऱ्यांनी रस्त्यावरून चालायचे की वाहनांनी हा प्रश्न पडतो.  पालिकेने रस्त्याची कामे सुरू करताना तेथील फेरीवाल्यांना हटविणे गरजेचे आहे. तात्पुरती त्यांची सोय इतरत्र ठिकाणी करावी. या ठिकाणची वाहतूक अन्यत्र हलवावी, कारण पायी चालताना रस्ता धड नसल्याने अनेकांचे चालताना पाय मुरगळणे, पडणे आदी प्रकार घडतात. या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना राबवाव्यात.

रस्त्यावर खड्डा कायम

अरविंद बुधकर, कल्याण</strong>

महापालिकेने एखादी मोहीम हाती घेतली आणि ती विनासायास पूर्ण झाली असे सहसा कधी घडत नाही. महापालिकेने लालचौकी ते आधारवाडी चौक या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले. त्यावेळी स्मशानाशेजारी नवीन मॉलसमोर पाइपलाइन फुटली म्हणून रस्ता खणला.  परंतु पालिकेच्या कंत्राटदाराला खड्डा बुजवण्याचे भान राहिले नाही. त्याचप्रकारे देवळासमोर पालिकेने अनधिकृत बांधकाम तोडले परंतु खड्डय़ाचे काम अर्धवट सोडले.यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. रिक्षांना नीट रांगेत उभे राहता येत नाही. सातव्या वेतन आयोगाचे स्वप्न पाहणारे अधिकारी याची जाणीव ठेवून काम पूर्ण करतील काय? महापालिकेचे आयुक्त रवींद्रन जोपर्यंत अधिकारी आणि पुढारी यांचे वेतन व मानधन कापत नाही, तोपर्यन्त यांना कर्तव्याचे भान येणार नाही.

पार्किंगचा विळखा

विजय वागळे, ठाणे</strong>

ठाणे शहरात ठिकठिकाणी बेकायदा पार्किंग होताना दिसत आहे. गोखले रोड, घोडबंदर, कॅसलमिल नाका, कोलबाड रोड आदि ठिकाणी भररस्त्यात वाहने उभी केली जातात. मुंबई-आग्रा रोड म्हणजेच वंदना चित्रपटगृहाच्या रस्त्यावर गॅरेजवाल्यांकडून वाहनांची दुरुस्तीकामे सुरू असताता. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहांजवळ मोठय़ा प्रमाणावर वाहनांची पार्किंग होत असते. बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते मात्र ही कारवाई तात्पुरती असते. ठाणे शहराचे माजी आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी रस्त्याला लागून असलेल्या गॅरेज, दुकानांना शिस्तीच्या चौकटीत बसवले होते. त्यामुळे ठाणे शहराला स्वच्छ ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता. मात्र टी. चंद्रशेखर यांच्या बदलीनंतर रुंद झालेले रस्ते अशा बेकायदा पार्किंगमुळे पुन्हा अरुंद होऊ लागले आहेत. टी. चंद्रशेखर यांच्यासारखेच आयुक्त ठाणे शहराला मिळायला हवेत.आज ठिकठिकाणी काही रस्ते ‘पार्किंग क्षेत्र’ होत चालले आहेत. शहरात स्वच्छता राहिलेली नाही. या सर्व गैरप्रकाराला आळा बसण्याची गरज आहे.

वृंदावन परिसरातील बेकायदा वेदरशेड हटवा

बु. रा. मोरगावकर, ठाणे.

वंृदावन परिसरात इमारतीला लागून असलेल्या वेदरशेडची संख्या वाढलेली आहे. या शेड पावसाळा किंवा उन्हाळ्यापासून संरक्षणासाठी उभारल्या जातात. योग्य शुल्क भरून पालिकेकडून त्याची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. ऋतू संपल्यावर अशी शेड काढणेही बंधनकारक असते. मात्र वृंदावन परिसरात या वेदरशेड अनधिकृतपणे पक्क्या केल्या असून त्या खाली दुकाने थाटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. येथील रहिवाशांना रहदारीसाठी मोठय़ा प्रमाणात त्रास होत असून त्यासंबंधीच्या तक्रारी वाढत आहेत. साधारण १२ वर्षांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने १३० दुकाने आणि ६० व्यापारी गाळ्यांचे बेकायदा वेदरशेडवर कारवाई केली होती. मात्र कालांतराने महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत व्यापाऱ्याने वेदरशेड पक्क्या केल्या. या वेदरशेडमुळे रहिवाशांना अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय शुल्क उपलब्ध होत नसल्याने पालिकेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल प्रशासनाने घेत योग्य ती कारवाई या संदर्भात व्हावी.

Story img Loader