‘रा कट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा..’ कवी गोविंदाग्रज यांनी केलेलं महाराष्ट्राचं वर्णन. महाराष्ट्रातील कोरीव लेणी पाहताना हा खरंच ‘दगडांचा देश’ असल्याची खात्री पटते. महाराष्ट्रात असंख्य लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्य़ातील अजिंठा-वेरुळची लेणी तर जगप्रसिद्ध. लोणावळ्याजवळील कार्ला, भाजा, मुंबईजवळील घारापुरी, बोरिवलीतील कान्हेरी, जुन्नरजवळील लेण्याद्री आदी लेणीही ऐतिहासिक आणि कोरीव शिल्पकलेचे सौंदर्य दाखविणारी. लेण्यांच्या या यादीत आणखी एक नाव जोडू या.. लोनाड!
लोनाड हे भिवंडीजवळील एक खेडे असून, येथे सातव्या शतकातील लेणी आहेत. कल्याणहून २० किलोमीटर अंतरावर असणारी ही लेणी म्हणजे शिल्पसौंदर्याचा उत्तम दाखला. भिवंडीहून मुंबई-नाशिक महामार्गावरून थोडे पुढे गेलात, तर सोनाळे फाटा लागतो. या फाटय़ावरूनच एक रस्ता लोनाड गावात जातो. सोनाळे फाटय़ावरून पुढे पुढे जात राहिलात तर एक उंच टेकडी दिसते. या टेकडीवरच लोनाडची लेणी आहेत. टेकडीच्या खाली एक मंदिर आहे. या मंदिराजवळ वाहने उभी करून पुढे चालत चालत टेकडी चढावी लागते. या रस्त्यावरून चालताना असे वाटतच नाही की पुढे लेणीसदृश काही तरी आहे.
टेकडीच्या मध्यभागी आलात, तर तिथे तुम्हाला ही बौद्धकालीन लेणी आढळतील. मध्यभागी एक गुहा म्हणजेच चैत्य आहे. त्याच्या प्रवेशद्वाराजवळच एक साधारण सहा फूट उंच असे दगडातील कोरीव शिल्प दिसेल. या शिल्पात राजा, राणी आणि त्यांच्या सेविका दिसतात. मारुतीच्या मंदिरात ज्याप्रमाणे मूर्तीला शिंदूर लावलेला असतो, तसाच शिंदूर या शिल्पाला लावलेला आहे. प्रवेशद्वार ओलांडून आत व्हरांडय़ात प्रवेश केल्यास आतमध्येही अनेक देवांच्या शिंदूर फासलेल्या मूर्ती आढळतात. गजानन महाराजांची तस्वीरही आतमध्ये लावण्यात आलेली आहे. आतमध्ये भिंतीवरही कोरीव काम केलेले आहे, तर खांबांवर आणि माथेपट्टीवरही शिल्पे कोरलेली आढळतात.
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक थंड पाण्याची टाकी दिसते. चौथ्या किंवा पाचव्या शतकात कोकण प्रदेशात मौर्य कुळातील राजा सुकेतू वर्मा हा राज्य करीत होता. त्याच्या काळात लोनाड हे प्रसिद्ध बौद्धधर्मीय केंद्र होते. मौर्य राजांच्या काळातच येथे ही लेणी बांधण्यात आल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे.
लोनाडची ही लेणी पाहून टेकडीवरून खाली उतरलात तर आतमध्ये गावामध्ये एक प्राचीन शिवमंदिर आढळेल. हे शिवमंदिर शिलाहार काळातील आहे. या मंदिराचा बाहेरील भाग जरासा जीर्ण झालेला आहे, मात्र आतमधील गाभारा सुरक्षित आहे. या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कोरीव काम केलेले आढळते.
इतिहासाची आवड आणि लेणी व शिल्पकला जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी लोनाड हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे.
लोनाडकाय पाहाल?
सातव्या शतकातील लेणी, प्राचीन शिवमंदीर.
कसे जाल?
* ठाण्याहून मुंबई-नाशिक महामार्गावरून भिवंडीजवळ आलात, तर सोनाळे फाटा लागेल. या फाटय़ावरून एक रस्ता लोनाड गावात जातो.
* कल्याणहून भिवंडीला जाण्यासाठी बस सुटतात. तसेच भिवंडी व कल्याणहून एसटीचीही सोय आहे.
* आडबाजूला असल्याने या भागात जाण्यासाठी स्वत:चे खासगी वाहन असल्यास उत्तम.