डोंबिवली : डोंबिवली शहर परिसरातील गुन्हेगारीला या शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये वर्षानुवर्ष राहत असलेले कुख्यात गुंड कारणीभूत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे डोंबिवलीतील सात झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या कुख्यात गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर तडीपारी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, मोक्का कायद्याने कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

या गुन्हेगारांवर यापूर्वी डोंबिवलीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांंवरून अटकेच्या कारवाया झाल्या आहेत. परंतु, हे गुन्हेगार तुरुंगातून सुटून आल्यावर पुन्हा आपल्या गुन्हेगारी कारवाया करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे मोकाट असलेले गुन्हेगार शहरात चोऱ्या, लुटमार, परिसरात शस्त्रे घाऊन दहशत माजविणे, पादचाऱ्यांची लुुटमार करणे असे प्रकार करत आहेत. डोंबिवली, कल्याण शहर परिसरात गुन्हा करायचा आणि आपल्या झोपडपट्टीत येऊन लपून राहायचे अशी या गुन्हेगारांची वर्षानुवर्षाची पध्दत आहे.

हे गुन्हेगार राहत असलेल्या भागात नेहमीच रात्रीच्या वेळेत भांडणे, शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजविणे, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे, जुन्या वादातून भांडण उकरून काढून एखाद्याला मारहाण करणे, दोन व्यवहारांंमध्ये मध्यस्थी करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे, असे प्रकार नियमित करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मागील सहा महिन्याच्या काळात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांंनी कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये नशामुक्त अभियान राबवून या शहरांमधील मद्य, चरस, गांजा, अंमली पदार्थ तस्करीचे अड्डे उध्दवस्त केले आहेत. हे अड्डे चालविणाऱ्यांंवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शहरात अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त केला आहे. डोंबिवली, कल्याण शहरे नशामुक्त करण्याबरोबर गुन्हेगारी मुक्त करायची असतील तर या शहरांमधील झोपडपट्टी भागात वर्षानुवर्ष राहत असलेल्या कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई होणे खूप गरजेचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मत झाले आहे.

त्यामुळे डोंबिवलीतील ज्योतीनगर, शेलारनाका पाथर्ली, त्रिमूर्तीनगर, आंबेडकर वसाहत, इंदिरनगर, पाथर्ली, दत्तनगर, आयरेगाव, सिध्दार्थनगर अशा झोपडपट्टयांमधील कुख्यात गुन्हेगारांची माहिती जमा करून त्यांच्यावर तडीपारी, संघटित गुन्हेगारी, मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अशा सर्व गुन्हेगारांवर दाखल गुन्ह्यांची माहिती, त्याचे स्वरुप पाहून ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. दाखल गुन्ह्यांप्रमाणे या गुन्हेगारांवर कोणती कारवाई करायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दोन महिन्यापूर्वीच कोळसेवाडी पोलिसांनी कुख्यात मयत विशाल गवळीचे तीन भाऊ ठाणे, रायगड, मुंबई जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत. दोन दिवसापूर्वी डोंबिवलीतून शेलार नाका भागातील गणेश अहिरे उर्फ गटल्या या गुन्हेगाराला रामनगर पोलिसांनी एक वर्षासाठी नाशिक तुरुंगात स्थानबध्द केले. अशा कारवाईंच्या माध्यमातून गुन्हेगारांवर जरब आणि गुन्हेगारी कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.