ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांची वाहने उभी करता यावीत यासाठी मध्य रेल्वेने ठाणे स्थानकाच्या पश्चिमेला आणि महापालिकेने गावदेवी मैदानाखाली भूमीगत वाहन तळ उभारले आहे. नियमानुसार या वाहनतळामध्ये दुचाकी उभी करण्यासाठी दोन तासांचे १० रुपये तर ६ ते १२ तासांचे ३० रुपये आकारणे अपेक्षित आहे. परंतु गेल्याकाही महिन्यांपासून वाहन तळामध्ये प्रवासी आणि वाहन चालकांकडून सर्रास लुबाडणूक सुरू आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असतानाही त्यांच्याकडून कठोर कारवाई केली जात नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या वाहनतळामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज हजारो प्रवासी तसेच कामानिमित्ताने चालक वाहने घेऊन येत असतात. या वाहन चालकांना त्यांची वाहने वाहन तळात उभी करता यावी यासाठी रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला फलाट क्रमांक एकजवळ वाहन तळ उभारले आहे. या वाहन तळाचे कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. नियमानुसार, दुचाकी उभी करण्यासाठी दोन तासांपर्यंत १० रुपये, दोन ते सहा तासांसाठी २० रुपये, ६ ते १२ तासांसाठी ३० रुपये आणि १२ तासांहून अधिक वेळ वाहन उभे केल्यास ४० रुपये आकारणे अपेक्षित आहे. असे असतानाही एक ते दोन तासांसाठी देखील वाहन चालकांकडून ३० रुपये आकारण्यात येत आहे. या वाहन तळामध्ये वाहने पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरून वाहन खाली उतरविण्यासाठी एक उतार तयार करण्यात आला आहे. या उतारावर देखील एका दिशेला नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जात आहे.
ठाणे महापालिकेने देखील गावदेवी मैदानाखाली ४ हजार ३३० चौ. मीटर इतके प्रशस्त भूमिगत वाहनतळ उभारले आहे. या वाहन तळात एकाचवेळी शेकडो वाहने उभी राहू शकतात इतकी या वाहन तळाची क्षमता आहे. याठिकाणी देखील ठेकेदाराकडून अशाचपद्धतीने एक तास किंवा त्याहून कमी कालावधीसाठी ३० रुपये आकारले जात आहे. या प्रकाराबाबत समाजमाध्यमावर तक्रारी करूनही कठोर कारवाई केली जात नसल्याचे चालकांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, लेखी तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या वाहन तळामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अशापद्धतीने लुबाडणूक सुरू आहे. वाहन तळामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अनेकदा गुंडगिरीची भाषा केली जाते. रेल्वेच्या कार्यालयाजवळच हे वाहन तळ आहे. असे असतानाही अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी लक्ष दिले जात नाही. – निशांत बंगेरा, प्रवासी.
वाहनतळातील ठेकेदाराने निर्धारित शुल्क घेणे आवश्यक आहे. नियमापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. – पी.डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे