ठाणे : नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर येथील आनंदनगर भागातील डि-मार्ट परिसरातील थांब्यावरील रिक्षाचालक मीटरऐवजी ठराविक दुप्पट रक्कम घेऊन प्रवाशांची लूट करित आहेत. आम्ही मीटरप्रमाणे वाहतूक केली तर संघटनेकडून धमकाविले जात असून नाईलाजास्तव आम्ही ठराविक रक्कम घेऊन प्रवासी वाहतूक करीत असल्याचा दावा रिक्षाचालकांकडून करण्यात येत आहे. स्वयंघोषित संघटनेच्या नावाने प्रवाशांच्या सुरू असलेल्या लुटमारीकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. माजिवाड्यापासून ते गायमुखपर्यंत मोठ-मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून याठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत. गृहसंकुलांबरोबरच मोठ-मोठे माॅल आणि आस्थापनांची उभारणी करण्यात आली आहे. अशाचप्रकारे आनंदनगर परिसरात डी-मार्ट हा माॅल असून याठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. परंतु येथून खरेदी करून घरी परतणाऱ्या नागरिकांची रिक्षाचालकांडून खुलेआम लुटमार सुरू असून त्याकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न, माजी नगरसेवकांकडून मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी

डि-मार्ट शेजारीच प्रवाशांच्या वाहतुकीसाठी रिक्षा थांबा उभारण्यात आला आहे. या थांब्यावर उभे असलेले रिक्षाचालक मात्र मीटरप्रमाणे भाडे नेण्यास नकार देतात. या माॅलपासून कासारवडवलीपर्यंतचे रिक्षाभाडे २५ रुपयांपर्यंत होते. परंतु येथील रिक्षाचालक ५० रुपये भाडे आकारतात. इतके भाडे देणार असाल तर रिक्षात बसा, असे रिक्षाचालकांकडून प्रवाशांना सांगितले जाते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. पर्याय नसल्यामुळे प्रवाशी जास्त भाडे देऊन प्रवास करित आहेत.

हेही वाचा – ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी प्रशांत रोडे यांची नियुक्ती

आम्ही मीटरप्रमाणे वाहतूक केली तर संघटनेकडून धमकाविले जाते. मीटरप्रमाणे भाडे घेणार असाल तर थांब्यावर रिक्षा उभी करायची नाही, असा दम संघटनेकडून दिला जातो. नाईलाजास्तव आम्ही ठराविक रक्कम घेऊन प्रवासी वाहतूक करतो, असा दावा काही रिक्षाचालकांनी केला. स्वयंघोषित संघटनेच्या नावाने सुरू असलेल्या लुटीमुळे घोडबंदरवासी हैराण झाले आहेत. या संदर्भात कासारवडवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loot of ghodbunder passenger by rickshaw drivers ssb
Show comments