दुचाकीवरुन चाललेल्या एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला तोतया पोलिसाने लुटल्याचा प्रकार शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावाजवळ घडला आहे. हेलमेट कुठं आहे असं विचारत त्या तोतया पोलिसाने दाम्पत्याजवळील ३५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज लुटला. या प्रकरणी किशनचंद मंगाला बागानी (६६, रा. युरोपा सोसायटी, कासाबेला गोल्ड, पलावा, डोंबिवली) यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- जागेच्या वादातून एकावर गोळी झाडण्याचा प्रयत्न; एकाला अटक

मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशनचंद बागानी हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. गुरुवारी सकाळी ते पत्नीसह दुचाकी वरुन निळजे गावातून काटई नाका दिशेने चालले होते. निळजे गावाच्या कमानी जवळ त्यांची दुचाकी एका इसमाने थांबवून तुम्ही हेलमेट घातले नाही. तुम्ही नियमभंग करत आहात, असे चढ्या आवाजात दम दिला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सोन्याचे दागिने घालून फिरू नका, असे पोलीस, शासनातर्फे सतत सांगण्यात येते तरी तुमच्या पत्नीने सोन्याच्या बांगड्या घातले आहेत, असे म्हणत आरोपीने किशनचंद यांच्या पत्नीला दागिने काढण्यास सांगून ते तोतया पोलिसाने दिलेल्या कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर पुढचा प्रवास करण्याची तंबी तोतयाने दाम्पत्याला दिली. कागदात दागिने गुंडाळून ठेवत असताना तोतया पोलिसाने हातचलाखी करुन बनावट दागिने दाम्पत्याच्या ताब्यात दिले आणि खरे दागिने स्वत:कडे घेऊन घटनास्थळावरुन पळ काढला.

हेही वाचा- कल्याणमध्ये घरातील सोन्याच्या ऐवजावर मोलकरणीचा डल्ला

दुचाकी पुढे गेल्यानंतर पत्नीने पुन्हा दागिने तपासले त्यावेळी त्यांना दागिने बनावट असल्याचे दिसले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर किशनचंद यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक के. डी. गांगुर्डे तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Looting of senior citizens by fake police in nilje village near dombivali thane dpj
Show comments