लॉर्ड शिवा, चिकणघर, कल्याण (प)
कल्याण शहराचा मध्यवर्ती भाग पूर्णपणे निवासी संकुले, दुकाने, फेरीवाले, वाहनांची वर्दळ आणि पादचाऱ्यांनी गजबजलेला दिसतो. वाहनांचे कर्णकर्कश आवाज, विक्रेत्यांची मालाच्या विक्रीसाठी गळेफाड ओरड, वाहनांच्या धक्क्यातून होणारी भांडणे, मारामाऱ्या, भुरटय़ा चोरांचा सुळसुळाट अशा अनेक समस्या पादचारी प्रवाशांच्या पाचवीला पुजलेल्या असतात. या मध्यवर्ती भागातून तीन ते चार किलोमीटर अंतरावर गेल्यावर कुठे तरी शांतता जाणवते. या शांततेच्या ठिकाणी सध्या विकासकांनी आपले पाय रोवले आहेत. अनेक टोलेजंग इमारती येथे उभ्या राहिल्या आहेत. अनेक नव्या इमारतींचे बांधकाम येथे सुरू आहे. अशातील एक म्हणजे १० ते १२ वर्षांपूर्वी उभी राहिलेली ‘लॉर्ड शिवा’. कल्याणमध्ये अभावानेच आढळणारी शांतता येथे अनुभवता येते.
कल्याण शहराच्या पश्चिमेस साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर चिकणघर येथे लॉर्ड शिवा हे निवासी संकुल आहे. बांधकाम व्यावसायिक हा शंकराचा निस्सीम भक्त असल्याने त्याने आपल्या संकुलाचे नावही तेच ठेवले आहे. हे संकुल उभारताना वास्तुकलेचा कल्पकपणे वापर केल्याचे प्रथमदर्शनीच दिसते. लॉर्र्ड शिवा हे संकुलाची पायाभरणी साधारण २००३ मध्ये झाली. ७ ते १२ मजल्यांच्या ९ इमारती प्रशस्त जागेत उभारण्यात आल्या आहेत. या संकुलात एकूण २५० सदनिका आहेत. मराठी भाषिक कुटुंबीयांची संख्या जास्त असली तरी सिंधी, गुजराती, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मुस्लीम आदी समाजांतील कुटुंबेही येथे राहतात. सोसायटी स्थापन होण्याआधी येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते; परंतु सोसायटीची स्थापना झाल्यानंतर संघटित वृत्ती निर्माण झाल्याने आलेल्या समस्या चुटकीसरशी सुटल्या जात आहेत.
लॉर्ड शिवा संकुलात सध्या एक मोठी समस्या उभी राहिली आहे. इमारतींना पाणीपुरवठा करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने सहा इंचांची जलवाहिनी मंजूर केली होती; परंतु प्रत्यक्षात विकासकाने दोन इंचांची जलवाहिनी टाकली आहे. काही वर्षे दोन इंच जलवाहिनीतून केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे बिल रहिवाशांकडून पालिका वसूल करीत होती. मात्र नंतर अचानकपणे पालिकेला जाग आली आणि इमारतीला सहा इंची जलवाहिनी मंजुरीचा फतवा काढत लाखो रुपयांची थकबाकीची नोटीस सोसायटीला पाठविली आहे. हा सर्व प्रकार रहिवाशांसाठी अनभिज्ञ असल्याने त्यांना ही नोटीस पाहून धक्काच बसला आहे. सुमारे ३५ ते ३८ लाखांची पाणी बिलाची ही थकबाकी असून ती भरा अन्यथा पाणी कापले जाईल, असा इशारा सध्या पालिका प्रशासनाकडून दिला जात आहे. मध्यंतरी पालिकेने या संकुलाचे पाणी दोन दिवस बंदही केले होते. पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने त्यासाठी कुणाची हेळसांड होऊ नये, यासाठी सोसायटीने विकासक आणि उशिरा जाग आलेल्या प्रशासकीय चुकांचे खापर आपल्या अंगावर घेत कसेबसे थकबाकीतील १० लाख रुपये अदा करून पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. मात्र उर्वरित थकबाकीच्या रकमेसाठी पालिकेकडून सातत्याने तगादा सुरू असल्याने रहिवासी चिंतेत आहेत. आम्हाला अंधारात ठेवून हा प्रकार झाला आहे. गेले अनेक महिने नित्यनियमाने वेळेवर पाणीपुरवठय़ाचे बिल आम्ही भरत आहोत. पालिकेला हे माहिती असूनही ते त्रास देत आहेत, असा संताप सोसायटीचे खजिनदार महेश खोपकर यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात दोन इंचांच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत असताना जी अस्तित्वातच नाही अशा सहा इंचांच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होत असल्याचे दाखवून पालिका सोसायटीकडून लाखो रुपये उकळत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. पालिका आर्थिक डबघाईत असल्याने सध्या असा प्रकार या इमारतीतच नव्हे तर इतर काही इमारतींच्या बाबतीतही होत असल्याचे येथील रहिवाशांकडून सांगण्यात येते. या अन्यायाविरोधात न्याय मिळण्यासाठी सोसायटी न्यायालयात धाव घेण्याच्या प्रयत्नात आहे. ही समस्या दूर करण्यासाठी येथे राहणारे नगरसेवक पवन भोसले आणि स्थानिक नगरसेवक संजय पाटील हे सहकार्य करीत आहेत, असे येथील रहिवाशांनी सांगितले.
लॉर्ड शिवा ही जरी कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असली तरी तिला मिळणारा हा वीजपुरवठा आजही भिवंडी वीज उपकेंद्रातून होत आहे. या उपकेंद्रात जर मोठा बिघाड झाला तर येथील वीज तासन् तास बेपत्ता होते. लॉर्ड शिवा हे संकुल कल्याण आणि शहाडच्या मध्यभागी स्थिरावले आहे. महापालिकेच्या सुविधा जरी त्यांना मिळत असल्या तरी ग्रामीण भागात हे संकुल दाखविण्यात आल्याने त्यांना मिळणारा वीजपुरवठा हा भिवंडी वीज उपकेंद्रातून होतो, असे खोपकर यांनी सांगितले.
रिक्षा प्रवास सोयीस्कर
संकुल जरी कल्याण स्थानकापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असले तरी वाहतुकीची अनेक साधने येथे उपलब्ध आहेत. महापालिकेची परिवहन सेवा रडत-रखडत का होईना येथे सुरू आहे. रिक्षावाहतूक रहिवाशांसाठी सोयीस्कर असून रात्री उशिरापर्यंत या मार्गावर रिक्षा उपलब्ध असते. कल्याण स्थानकापासून थेट संकुलापर्यंत जाण्यासाठी रिक्षा प्रवास ४० रुपये आहे. भागीदारीत रिक्षातून प्रवास केल्यास प्रत्येकी १० रुपये द्यावे लागतात. या रिक्षांचा थांबा संकुलापासून पाच ते सात मिनिटांच्या अंतरावर आहे. मात्र कल्याण स्थानकापासून संकुलापर्यंत जाण्यासाठी भागीदारीतील प्रवासी रिक्षा क्वचितच सापडतात. रेल्वे प्रवासासाठी कल्याण आणि शहाड ही दोन्ही स्थानके सारख्याच अंतरावर आहेत.
सण-उत्सव उत्साहात
वर्षभरात येणारे २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, होळी, रंगपंचमी, दिवाळी आदी सण उत्साहात साजरे होत असतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीचा मोठा कार्यक्रम असतो. गणेशोत्सव सात दिवस साजरा केला जातो. या वेळी लहान मुलांसाठी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लॉर्ड शिवा संकुलात नावाप्रमाणे एक शिवमंदिरही आहे. मंदिरही भव्य स्वरूपात बांधले असून महाशिवरात्रीच्या दिवशी येथे भाविकांची गर्दी असते. हरितालिका, श्रावणातील सोमवार तसेच महाशिवरात्र दिनी येथे भक्तिमय वातावरण निर्माण होते.
विरंगुळ्याची साधने समाधानकारक
संकुलाच्या कडेकपारी विविध शोभिवंत झाडा-फुलांनी वेढल्या गेल्या आहेत. येथे छोटे उद्यान असून लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्यही ठेवण्यात आले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. संकुलाच्या जागेतच शेजारी महापालिकेचे भव्य उद्यान आहेत. उद्यानात जॉगिंग ट्रॅक आहे. विरंगुळा म्हणून रहिवासी या उद्यानाचा वापर करतात. क्लब हाऊसमध्ये व्यायामशाळा कार्यरत असून कॅरम, टेबल टेनिस अशा अंतर्गत खेळ-सुविधांचाही लाभ रहिवासी घेत आहेत. शेजारीच मोठे मैदान असल्याने क्रिकेटसारखे मैदानी खेळही येथे खेळण्यास मिळतात.
लाभदायक अग्निशमन यंत्रणा
संकुलात अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे; परंतु गेली अनेक वर्षे ती कार्यरत नव्हती. मात्र सोसायटी झाल्यानंतर ती सध्या कार्यरत केली गेली आहे. ती किती आवश्यक आहे याची जाणीव घडलेल्या एका घटनेने रहिवाशांना करून दिली आहे. मध्यंतरी एका घरात सकाळच्या सुमारास गॅस सिलेंडरची गळती होऊन त्याला आग लागली होती. सकाळची वेळ असल्याने सर्वाच्याच गॅस शेगडय़ा सुरू होत्या. अशातच ती आग वाढली असती तर सिलेंडरचा स्फोट होऊन इतर घरांतील सिलेंडरही या स्फोटात येऊन भयंकर दुर्घटना झाली असती. मात्र शिर्के नावाच्या अग्निशमन यंत्रणा प्रशिक्षित सुरक्षा रक्षकाने संकुलातील अग्निशमन यंत्रणेचा धाडसाने वापर करत ही आग अग्निशमन दलाच्या गाडय़ा येण्याअगोदर विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. या धाडसाबद्दल शिर्के यांचे समारंभपूर्वक कौतुकही आम्ही केले होते, याची आठवण खोपकर यांनी सांगितली.
संकुलाची वैशिष्टय़े
’अग्निशमन यंत्रणा
’१८ सुरक्षा रक्षकांसह ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा
’व्यायामशाळा, अंतर्गत खेळ सुविधा
’भव्य उद्यान आणि खेळाचे मैदान उपलब्ध
’गुन्हेगारांची भीती नाही
’योगसाधने विनामूल्य वर्ग
’बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, दवाखाने, चित्रपटगृह, काही मिनिटांच्या अंतरावर
’वाहतूक व्यवस्था रात्री उशिरापर्यंत
उद्यानाचा लाभ
या वसाहतीत सुविधांप्रमाणे समस्याही आहेत. शेजारी पालिकेच्या उद्यानात पूर्वी महाविद्यालयीन टोळक्यांचे अशोभनीय प्रकार नेहमी घडत असत. त्याबाबत पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे हे प्रकार आज बंद झाले आहेत. सताड उघडे असणारे हे उद्यान आता केवळ सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास ठरावीक वेळेत उघडत असते. सोसायटीतील रहिवासी याचा चांगला वापर करतात, अशी माहिती सुनील दीक्षित यांनी दिली. वाहनतळाची चांगली व्यवस्था असून चिकनघर पोलीस चौकी जवळच असल्याने गुन्हेगारीचा मागमूसही नाही. संकुलात मध्यभागी रस्ता असल्याने संकुल दुभंगले गेले असले तरी संकुलातील रहिवाशांची मने ही अभंग आहेत, असेच येथील रहिवाशी सांगतात.