डोंबिवलीतील इस्त्रीचालकाचा मुलगा भारतीय भूगर्भ सर्वेक्षण परीक्षेत देशात ४२वा
दहा बाय दहा फुटाचा गाळा. त्यात पाच जणांच्या कुटुंबाचा संसार. त्याच जागेच्या अध्र्या दर्शनी भागात मांडलेला इस्त्रीचा टेबल. परीटघडीच्या कपडय़ांची देवघेव करण्यासाठी ग्राहकांची सुरू असलेली वर्दळ. अशा वातावरणात एकाग्रतेने अभ्यास तर दूरच पण एका जागी बसणेही अशक्य. पण आपला पिढीजात व्यवसाय पुढे नेणाऱ्या वडिलांना मदत करतानाच कृष्णा कनोजियाने शिक्षणाची तपश्चर्या केली. प्रचंड मेहनत आणि वडिलांसह संपूर्ण कुटुंबाने दिलेली साथ या जोरावर २७ वर्षीय कृष्णाने केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय भूगर्भ सर्वेक्षण (जिओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया) परीक्षेत देशात ४२वा क्रमांक पटकावला.
डोंबिवली पूर्वेतील सावरकर रस्त्यावरील हरी गणेश सोसायटीत तळमजल्याच्या एका कोपऱ्याला कनोजिया कुटुंबीयांचा मागील चाळीस वर्षांपासून कपडय़ांना इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. आजोबांनी सुरू केलेला हा व्यवसाय कृष्णाचे वडील जगदीश यांनीही पुढे चालवला. पण आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवावी, असे त्यांना मनोमन वाटत होते. दुकानात येणारे ग्राहकही त्यांना हाच सल्ला देत. त्यामुळे मग जगदीश यांनीही कृष्णाच्या शिक्षणासाठी झेपेल तितका आणि जमेल तितका खर्च केला. मूळचा हुशार असलेल्या कृष्णानेही वडिलांचे परिश्रम आणि विश्वास दोन्ही सार्थ ठरवून शालेय जीवनापासूनच यश मिळवण्यास सुरुवात केली.
बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर कृष्णाने मुलुंडच्या वझे-केळकर महाविद्यालयातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली. पुढे पदव्युत्तर पदवीही (एमएससी) मिळवली. त्याला उच्चशिक्षणासाठी जर्मनीला जाण्याची संधी होती. परंतु हा आर्थिक भार कुटुंबाला पेलवण्याची शक्यताच नव्हती. दरम्यानच्या काळात त्याने आयआयटीमधील प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परंतु या परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी आणि पुढील खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. याच परिसरातील पार्वती सहनिवास येथे राहणारे अर्थ गुंतवणूक मार्गदर्शक विजय गोखले यांनी कनोजिया कुटुंबाची अडचण ओळखली आणि कृष्णाला आर्थिक मदत देऊ केली.
संयुक्त परीक्षेत कृष्णाला चांगले गुण मिळाले व मुंबई, कानपूर, गुवाहाटी आयआयटीमधून प्रवेशासाठी निमंत्रणही आले. त्यामुळे मग कर्ज काढून जर्मनीला जाण्याऐवजी कृष्णाने आयआयटीमधूनच पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. तो सध्या मुंबई आयआयटीमधून शिक्षण पूर्ण करत आहे. आयआयटीसाठी प्रयत्न करत असतानाच कृष्णाने केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाची परीक्षा दिली. शास्त्रज्ञपदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने देशातील गुणवत्ता यादीत ४२वा क्रमांक पटकावला. त्याला कोलकाता येथील भूगर्भ विभागात नेमणूक मिळाली आहे. २१ जुलैपासून कृष्णा या पदावर कार्यरत होणार आहे.
‘घरातील संस्कार, परिसरातील संस्कारक्षम वातावरण आणि परिस्थितीत शिकवलेले धडे, आध्यात्मिक प्रभाव या वातावरणाने आपली घडण केली आहे. शिक्षणात खूप झेप घ्यायची होती, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काही गोष्टींना आवर घालावा लागला. आपणास भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करायचे आहे,’ अशी आशा कृष्णाने व्यक्त केली.

भगवान मंडलिक

Story img Loader