एक भले मोठे तळे.. त्याच्या काठावर छोटी-मोठी झाडेझुडपे.. डोंगरकपारींची साथ.. कातळ आणि ओबडधोबड दगडांची वाट आणि आजूबाजूची हिरवळ.. गेल्या दहा-पंधरा वर्षांपूर्वीच्या ठाण्यातील उपवन तलावाचे हे वर्णन प्रेमी युगुलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. त्यामुळे प्रेमात पडल्यानंतर उपवन परिसरात जाऊन प्रेमाच्या गुजगोष्टी करण्याचा दिनक्रम अनेक महाविद्यालयीन तरुणांचा बनला होता. कोणत्यातरी थिएटरमध्ये चित्रपट पाहायचा किंवा या तळ्याच्या काठावर प्रेमाला बहर आणायचा.. त्यामुळे शहरातील काही मुलांसाठी उपवन म्हणजे प्रेमाचा धक्का, तर काहींसाठी नाक मुरडण्याचे ठिकाण बनले होते. ठाणे-कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अशा अनेक प्रेम क्षेत्राची ख्याती दूरवर पसरलेली आहे. त्यामध्ये ठाण्याचा उपवन, मासुंदा, कचराळी हे तलाव, येऊरचे जंगल, कल्याण-डोंबिवलीतील भोपरची टेकडी, कोपरचे उन्नत स्थानक आणि कल्याणचा गणेशघाट. सगळ्यांचा एकच समान धागा, तो म्हणजे इथे येणारी प्रेमी युगुले.. त्यामुळे गेली पंधरा वर्षे या भागात अनेक सुसंस्कृत मुली जाण्यासही कचरत. शहरीकरणाच्या वेगापुढे प्रेम क्षेत्रेही कमालीची बदलली. महापालिकांनी या भागांमध्ये मनोरंजन मैदानांप्रमाणे विकास केला आणि प्रेमी तरुणाईप्रमाणे सगळ्याच नागरिकांचा या भागातील राबता वाढू लागला. त्यामुळे पूर्वी एकांतासाठी ओळखली जाणारी ही ठिकाणेही गर्दीने ओसांडून वाहू लागली आहेत. सकाळी फिरणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मंडळी या सगळ्यांच्या राबत्यामुळे या प्रेमी युगुलांचाही धीर चेपत गेला आणि एकांताऐवजी या गर्दीमध्ये प्रेमांकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक असो किंवा स्कायवॉक, मासुंदाचा किनारा असो किंवा उपवनचा परिसर या गर्दीमध्येसुद्धा प्रेम खुलू लागले असून, प्रेमाचा हा एकांतातून गर्दीकडे झालेला प्रवास शहराच्या संस्कृतीचा भाग बनू लागला आहे.
उपवन तलावाच्या परिसरामध्ये फिरत असताना आता त्या भागामध्ये मोठी गृहसंकुले दाखल झाली असून हा परिसर एखाद्या स्वप्ननगरीचे रूप घेऊ लागला आहे. आलिशान टॉवर्स, आकाशाला टेकलेल्या नव्हे आकाशात घुसलेल्या इमारती, प्रत्येक इमारतीचे वेगवेगळे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे हा परिसर वाहनांच्या गर्दीनेसुद्धा निरंतन वाहू लागला आहे. पूर्वी उपवन तलावाच्या काठावर रांगेने जोडपी बसलेली दिसायची. आजही ती दिसतात. इथल्या अनेक तलावांमध्ये बोटिंगही चालायचे, पण आता इथे येणाऱ्या कपल्सची संख्या फारच कमी झालीय, बोटिंगही बंद होतेय की काय असे वाटते. कारण तलावाच्या काठी बसून प्रेमसागरामध्ये बुडण्यापेक्षा कपल्स विवियाना मॉलच्या फूडकोर्टला भेट देतात. कोरममॉलमध्ये मनसोक्त फिरतात. दिवसभर हुंदडून झाले तरी मॉल परिसर दररोज पायदळी तुडवण्याचा दिनक्रमच तरुणाईने सुरू केला आहे. ठाण्याची संस्कृती झपाटय़ाने बदलली असून मॉल्स, फूड प्लाझा यांच्या संख्येत भराभर वाढ होते आणि त्या प्रत्येक ठिकाणी ही तरुणाई सर्रास धाव घेते. नवी हॉटेल्स, कॉफी शॉप सगळीकडे गर्दी असते आणि या गर्दीमध्येही प्रेमाचा वर्षांव करण्यास ही मंडळी तयार असतात.
सीसीडी काय, बरिस्टा काय किंवा सब वे काय.. प्रेमीजनांच्या या हक्काच्या जागा. कॉफी निव्वळ निमित्त असते. परंतु या कॉफी टेबलाच्या अवतीभवती इथे खूप काही घडत जाते. कॅफे कॉफी डेमध्ये जाण्याचा विचार आल्यानंतर अनेक तरंग मनात उमटल्याशिवाय राहत नाही. कॉफीच तर प्यायचीय तर मग आपल्या नाक्यावरच हॉटेल आहे ना? त्यासाठी ही हायफण्डा कॉफीशॉप्स कशाला? परंतु तिथे गेल्यानंतरच त्याचे अंतरंग उलगडल्याशिवाय याचा खरा अर्थ कळत नाही. खरेतर ही एक वेगळी दुनियाच आहे. ही संस्कृती आपली नाही, तिथले जगणेही आपले नाही असा सूर आळवणारी अनेक मंडळी ही तुम्हाला याच कॉफी शॉपमध्ये पाहायला मिळतील. इथे येणारा प्रत्येक जण या दुनियेच्या प्रेमात पडतोच. शिवाय प्रेमात पडलेला आणि बुडलेला प्रेमी या ठिकाणांच्या खरे प्रेमातच असतो. काचेच्या शिशमहलासारख्या दिसणाऱ्या कॉफी शॉप्सनी ठाण्यामध्ये गेल्या पाच ते दहा वर्षांमध्ये आपला पसारा प्रचंड वाढवला आहे. केवळ कॉफीच नव्हे तर खाण्यासाठीचेही अनेक पर्याय यात मिळतात. काचेच्या भल्यामोठय़ा पारदर्शक खिडक्या आणि दारे, निळ्या गुलाबी रंगाचे बोर्ड, गुलाबी कपडय़ानी सजवलेली टेबले आणि लोवेस्ट जीन्स आणि मेसेजवाले टी-शर्ट घातलेल्या पोरांनी हे शॉप भरभरून वाहतच असतात. केवळ हॉलीवूड आणि परदेशी चॅनल्सवर दिसणारे चित्र गेल्या अनेक वर्षांत ठाण्यात अवतरले असून त्यांचा पुरेपूर लाभ इथली तरुणाई घेताना दिसते. ठाणेकर मंडळी या सगळ्याचा पुरेपूर अस्वाद घेत असून कोणत्याही ठिकाणी त्यांची गर्दी लक्षणीय अशीच असते. एरव्ही हॉटेलात दहा-वीस रुपयांना मिळणाऱ्या कॉफीसाठी इथे पाचशेची नोटही कमी पडते. पण त्या पैशांच्या मोबदल्यात जे काही पदरात पडते, त्याला खरंच मोल नाही. निदान पैशात तरी ते मोजता येणार नाही. त्यामुळे प्रेमी युगुलांसाठी ही पर्वणीच ठरते असते. सकाळ-संध्याकाळ कॉफी शॉप्स गर्दीने ओसंडलेली असतात. दुपारी जरा ओहोटी असते. त्यामुळे प्रेमी कपल्ससाठी ही वेळ मस्त असते. कधी फक्त तीन-चार कपल्स. कोपऱ्याची टेबले पकडून बसलेली असतात. एक कपल छानपैकी सोफ्यावर विसावलेले असते. टेबलावर कॉफीचा एखादा ग्लास सोबत कुकीजचे पॅकेट. कुणी छोटासा केकही ऑर्डर केलेला असतो. तो तिला आपल्या हातांनी केकचा तुकडा भरवतोय आणि ती हलकेच त्याच्या बोटाचा चावा घेत केकचाही बाइट घेते. इतके रोमॅन्टिक वातावरण इथेच निर्माण होते, तेही एकदम खुल्लम खुल्ला असेच म्हणावे लागेल. इथे दुसऱ्या टेबलवर काय चाल्लेय, याच्याशी बाकीच्यांना काहीच कर्तव्य नसते. एखाद्या कपलकडे बाकीचे पाहताहेत, असला गावठीपणा कॉफी शॉप्सच्या सो कॉल्ड कल्चरमध्ये शोभत नाही. हा इथला अलिखित नियम म्हणा किंवा एथिक्स. पब्लिक प्लेसमध्ये प्रायव्हसीचा स्वर्ग, हेच तर या कॉफी शॉप्सचे महत्त्वाचे वैशिष्टय़ असते. त्यामुळे प्रेमाचा हा खुला बाजार सगळीकडेच अवतरू लागला आहे. कोणीही या.. काहीही करा.. याचे स्वातंत्र्य या सार्वजनिक ठिकाणी असले तरी ठाण्यातील या शॉप्समध्ये अजून तितका मोकळेपणा आलेला दिसत नाही. त्यामुळे प्रेमाचा आनंद लुटायचा असेल तरी पुन्हा उपवन, मासुंदा आणि कचराळीकडेच तरुणांची पावले वळतात.
ज्येष्ठ नागरिकांसाठी महाविद्यालयीन तरुणांचा ‘व्हॅलेन्टाईन डे’
प्रेम केवळ दोन जोडीदारांमध्ये असते ही भावना महाविद्यालयीन तरुणांमधून काहीशी कमी होऊन समाजातील प्रत्येक घटकासोबत प्रेम व्यक्त करू शकतो, याची जाणीव तरुणाईला झाली आहे. त्यामुळे समाजाकडून दुर्लक्षित झालेल्या समाज घटकातील मंडळींना भेटून त्यांच्या सोबत प्रेमाचा हा दिवस साजरा करण्याचा ट्रेन्ड सध्या तरुणांमध्ये रुजू लागला आहे. त्यातूनच ठाण्यातील एका तरुणाने त्यासाठी पुढाकार घेतला आणि ‘उम्मीद’ या संस्थेची सुरुवात करण्यात आली. व्हॅलेंटाईन डे जवळ येऊ लागल्यावर या तरुणांच्या समूहात चर्चा सुरू होते ती या वर्षीच्या व्हॅलेन्टाईन डेला कोणत्या आजी-आजोबांना गुलाब द्यायचे. प्रेमाचा दिवस केवळ स्वत:पुरता आणि जोडीदारासोबत संकुचित न ठेवता ‘उम्मीद’ संस्थेची तरुण मंडळी या दिवशी वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टय़ावर जातात आणि तेथील ज्येष्ठ नागरिकांना गुलाब देऊन प्रेमाचा दिवस साजरा करतात. बांदोडकर महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रशांत सिंग या तरुणाला प्रेमाचा दिवस ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करण्याची कल्पना सुचली. आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन गेली तीन वर्षे दहा-पंधरा समूह व्हॅलेंटाईन डे ठाण्यातील वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टय़ावर जाऊन साजरा करतात. स्वत:च्या पॉकेटमनीोमधील काही पैसे खर्च करून उम्मीदची मंडळी रस्त्यावरील भिकारी, वंचित मुले यांना गुलाब देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात. गरजू विद्यार्थ्यांना आपल्याकडील जुन्या वह्य़ांच्या उरलेल्या पानांची नवीन वही तयार करून काही शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. यंदाच्या वर्षी व्हॅलेंटाईन डेला ठाण्यातील सावरकरनगर, वागळे इस्टेट परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना वह्य़ा, पुस्तके देण्याचे उम्मीदच्या तरुणांनी ठरवले आहे.
आमचा व्हॅलेन्टाईन
घरच्यांसोबत माझा व्हॅलेन्टाईन..
व्हॅलेन्टाईन डे हा प्रेमाचा दिवस असला तरी त्याला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा असता कामा नयेत. आपण प्रेम कोणावरही करू शकतो आणि ते व्यक्त करण्यासाठी व्हॅलेन्टाईन डेसारखा दुसरा योग्य दिवस नाही. त्यामुळे मी माझा व्हॅलेन्टाईन डे माझ्या घरच्यांसोबत साजरा करणार आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे मित्र-मैत्रिणींसोबत आपण नेहमीच वेगवेगळे दिवस साजरे करतो, तर कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत हा दिवस आवर्जून साजरा होतो. घरच्यांसोबत आपण ठरवून हा दिवस साजरा करत नाही. त्यामुळे यंदा मी घरच्यांसोबत हा दिवस साजरा करणार आहे.
– मानसी मिसाळ, ठाणे</strong>
मॉल्सची खरेदी आणि भटकंती..
प्रेम म्हणजे भावना आणि या भावना व्यक्त करण्याची सगळ्यांची पद्धत वेगळी असते. त्यामुळे आम्ही या भावना सगळ्या मैत्रिणी एकत्र येऊन व्यक्त करणार आहोत. यंदा रविवार असल्याने संपूर्ण दिवस सुट्टीचा असणार आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत संपूर्ण दिवस फिरण्याचा आमचा विचार आहे. त्यानंतर रात्रभर जागरणाचाही विचार आम्ही केला आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी सगळ्यांनी सुट्टी घेतली असून हा दिवस खास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मॉल्समधील खरेदी आणि एकमेकींना चॉकलेट गिफ्ट करण्याचा आमचा दरवर्षीची परंपरा आम्ही यंदाही पाळणार आहोत.
– कृतिका सावंत, डोंबिवली
पालकांसोबत साजरा करणार
व्हॅलेंटाईन डे हा बहुतांश वेळा प्रेयसी आणि प्रियकर मोठय़ा प्रमाणात साजरा करतात. आपल्या जोडीदारासोबत प्रेमाचा दिवस साजरा करायलाच हवा. मात्र यंदा माझा प्रेमाचा दिवस आई-वडिलांसोबत साजरा करण्याचा विचार आहे. केवळ जोडीदारासोबत साजरा करण्याऐवजी मित्र-मैत्रिणी, पालक यांच्यासोबत एकत्रित हा दिवस साजरा करणार आहे. कामाच्या व्यग्रतेत वेळे अभावी विविध आश्रमात जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा करता येत नाही. मात्र यंदा रविवार असल्याने वृद्धाश्रमात आजी-आजोबांसोबत व्हॅलेंटाईन दिवस साजरा करणार आहे.
-अक्षय हेगडे, ठाणे
परदेशात असलेल्या मुलाची आठवण
प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी व्हॅलेंटाईन दिवसाचे निमित्त आहे. मन तरुण ठेवून व्हॅलेंटाईन दिवस साजरा करायला आवडते. हीच तारुण्याची खासियत आहे. हा व्हॅलेंटाईन वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायला हवा. प्रेम ही उदात्त भावना आहे. या दिवसाला प्रणयाचे बाजारू देखाव्याचे स्वरूप नसावे. माझी मुले परदेशात आहेत. व्हॅलेंटाईन दिवसाचा आनंद मी त्यांच्या आठवणीत शोधते. मुलाला बालपणीच्या आठवणी सांगून मी व्हॅलेंटाईन दिवसाच्या शुभेच्छा देते.
– सुषमा पांढरीपांडे, ठाणे