महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर तत्काळ मदत व बचावकार्य करता यावे यासाठी भारतीय सेनेच्या कलिना कॅम्पमधील नायब सुभेदार संजीव एस यांच्यासह तीन सुभेदारांनी मंगळवारी शहराचा पाहाणी दौरा करून सखल भागांची माहिती घेतली.

ठाणे महापालिका क्षेत्रातील सखल भागांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. अतिवृष्टी झाल्यास काही सखल भागांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचते. यामुळे परिसरातील गृहसंकुलांमधील नागरिकांचा मार्गच बंद होतो. काही ठिकाणी चाळींमध्ये पाणी शिरल्याने येथील नागरिक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे लागते. वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, साकेत (खाडी किनारी लगतचा परिसर), दिवा येथील खर्डीगाव, साबेगाव आणि देसाई नाका येथील रिव्हरवूड पार्क या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यंदाच्या पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर येथील नागरिकांना तत्काळ मदत आणि बचावकार्य करता यावे यासाठी भारतीय सेनेच्या कलिना कॅम्पमधील नायब सुभेदार संजीव एस यांनी मंगळवारी पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

त्यावेळी या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील सखल भागांची माहिती घेण्याबरोबरच प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत तीन सुभेदार, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश जाधव यांच्यासह पालिका अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader