कल्याण – कल्याण पश्चिमेतील पारनाका, सिध्देश्वर आळी गावठाण क्षेत्रात वीस वर्षापूर्वी रस्तारूंदीकरण करताना जलवाहिन्या टाकण्यात आल्या. नंतर या जलवाहिन्या पदपथ तयार करताना गटाराखाली गाडून टाकण्यात आल्या. यामधील अनेक जलवाहिन्या गंजून सडल्या आहेत. या गंजलेल्या सडक्या जलवाहिन्यांमधून अनेक सोसायट्यांना पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गावठाण क्षेत्रातील गळक्या सडलेल्या जलवाहिन्या शोधून त्या बदलून टाकाव्यात, अशी मागणी ठाकरे गटाचे शिवसेना उप शहरप्रमुख दिशेने शेटे यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्याकडे केली आहे.

कल्याणमधील गावठाण क्षेत्रातील अनेक जुन्या जलवाहिन्या वेळोवेळी झालेल्या रस्ता, काँक्रिटीकरण, रुंदीकरण कामांमुळे पदपथाखालून, गटारातून गेल्या आहेत. वर्षानुवर्ष या जलवाहिन्यांची तपासणी करण्यात आली नाही. भूमिगत असलेल्या या जलवाहिन्या अनेक ठिकाणी गंजून सडल्या आहेत. या जलवाहिन्यांमध्ये गटारातील सांडपाणी अनेक ठिकाणी झिरपत आहे. काही जलवाहिन्यांंमध्ये गाळ, लाकडाचे ठोकळे अडकले आहेत. त्यामुळे काही सोसायट्यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याविषयीच्या तक्रारीत पालिकेत नागरिक करत आहेत.

पालिका अधिकारी सोसायटीची टाकी, पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून सोसायटीला होणारा पाणी पुरवठा याविषयीची तपासणी करतात आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन देऊन निघून जातात. अनेक सोसायट्यांमध्ये आलेल्या जलवाहिन्या या पदपथांखालून, गटारातून आल्या आहेत. याची तपासणी कोणी करत नाहीत. त्यामुळे शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पालिकेने मागील १५ ते २० वर्षापूर्वी सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी टाकलेल्या जलवाहिन्यांची एकदा पुनर्तपासणी करावी. यावेळी मुख्य जलवाहिनीचीही तपासणी व्हावी. जेणेकरून त्या भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या सुस्थितीत आहे की नाही ते कळेल. या तपासणीत ज्या गंजलेल्या सडक्या जलवाहिन्या आहेत त्या बदलून टाकाव्यात अशी मागणी उपशहरप्रमुख दिनेश शेटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

कल्याण पश्चिमेतील सिध्देश्वर आळी, पारनाका भागातील गौरीनंदन सोसायटीला मागील काही दिवसांपासून कमी दाबाने, दुषित पाण्याचा पुरवठा होत होता. या कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा छडा पालिका अधिकाऱ्यांच्या साहाय्याने लावण्यात आला. त्यावेळी सोसायटीला होणारा पाणी पुरवठा भूमिगत गंजलेल्या जलवाहिनीतून होत असल्याचे समोर आले होते, असे शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे.