ठाणे – निवडणूक आयोगाकडून कोकण शिक्षक मतदार संघाकरीता शनिवार, १ ऑक्टोबर पासून मतदार नोंदणी सुरु करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातही मागील दहा दिवसांपासून याची नोंदणी सुरु झाली आहे. मात्र या नोंदणी प्रक्रियेच्या सुरवातीच्या टप्प्यात शिक्षक मतदारांकडून अल्प प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. मागील दहा दिवसांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून केवळ २१ शिक्षकांचेच नोंदणी अर्ज आले आहे. यात जिल्ह्यातील १ हजार ६२४ माध्यमिक शाळांतील शिक्षकांची यात नोंदणी केली जाणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्य बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून कोकण शिक्षक मतदार संघाकरिता शिक्षक मतदारांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातही मागील दहा दिवसांपासून या मतदार नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यासाठी १४ ठिकाणे घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिल कार्यालयाचा समावेश आहे.या ठिकाणी जाउन नोंदणी करता येणार आहे. मागील निवडणूकीत सुमारे १५ हजारांच्या घरात मतदार नोंदणी झाली होती. यावर्षी अधिक मतदार नोंदणी करण्याचा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. मतदार नोंदणीची हि प्रकिया १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. मागील दहा दिवसांपूर्वी ही नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असली तरीही शिक्षकांकडून मात्र याला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातून केवळ २१ शिक्षकांचेच अर्ज आले आहे. तसेच येत्या काही दिवसात शाळांना दिवाळीची सुट्टी लागणार आहे. यामुळे अनेक शिक्षक या नोंदणीसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यंदा शिक्षक मतदार संघाकरीता शिक्षकांची जेमतेम नोंदणीच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पात्र शिक्षकांनी पुढाकार घेऊन यात नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
या करीता सर्व राजकीय पक्ष आणि शैक्षणिक संघटनेच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात येणार असून, याबाबत शिक्षक मतदार वर्गात जनजागृती ही करण्यात येणार आहे. माध्यमिक श्रेणी किंवा त्यावरील शैक्षणिक संस्थेत १ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकापूर्वी लगतच्या मागील सहा वर्षांपैकी किमान तीन वर्षे शिक्षण सेवेत असणाऱ्या व्यक्तीला मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील पात्र शाळांमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांबरोबरच इतर जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या मात्र ठाणे जिल्ह्यात वास्त्यव्यास असलेल्या शिक्षकांना देखील यात नोंदणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच नोंदणीकरिता संबंधीत शाळांतील शिक्षकांची पात्रता तपासणीचे काम हे त्या संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांचे असणार आहे. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.