वाहनांवर बसू नये, यासाठी अणकुचीदार खिळ्यांचे पाट; श्वान, मांजरी जखमी होत असल्याच्या घटना
ऋषिकेश मुळे, ठाणे</strong>
दारात लावलेल्या वाहनावर पक्षी किंवा भटक्या जनावरांनी बसून घाण करण्याचे प्रकार नवीन नाहीत. हे प्राणी जाणूनबुजून अशा प्रकारची घाण करत नाहीत, हेदेखील उघड आहे. पण वाहनांवर अशा प्रकारे होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी ठाण्यातील कोपरी परिसरातील रहिवाशांनी अघोरी उपाय करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी प्राणी, पक्षी बसू नयेत, यासाठी वाहनावर तीक्ष्ण खिळे ठोकलेले पाट ठेवले जात आहेत. त्यामुळे नकळत एखादे श्वान किंवा मांजर त्यावर बसल्यास ते जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.
कोपरी भागातील चेंदणी कोळीवाडा परिसरात मोठी लोकवसाहत आहे. पूर्वीपासून या भागात इमारतींच्या समोर तसेच बैठय़ा घरांच्या आवारात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे रहिवासी रस्त्यांच्या दुर्तफा आपली वाहने उभी करतात. या वाहनांवर बसून श्वान, मांजरी आणि पक्षी अस्वच्छता करत असतात. काही वेळा श्वान वाहनांवर चढून त्यांचे नुकसानही करतात. त्यामुळे येथील रहिवाशांनी या प्राण्यांना हाकलण्यासाठी कठोर पाऊल उचलेले आहे. रहिवाशांची ही भूमिका प्राण्यांच्या जिवाला धोका पोहोचवणारी ठरू लागली आहे. रहिवाशांनी टोकदार मोठे खिळे ठोकलेले मोठे पाट चारचाकी वाहनांवर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच हे पाट श्वानांनी बाजूला टाकू नये याकरिता या पाटांना वाहनांना बांधून ठेवण्यात येतात. वरच्या बाजूला खिळ्यांचे टोक असल्याने नकळतपणे एखादा प्राणी त्यावर बसून जखमी होत आहे, अशी तक्रार काही प्राणीप्रेमींनी केली. अनेकदा श्वान आणि मांजर चारचाकी वाहनावर चढण्यासाठी उडय़ा मारत असल्याने थेट पाटावर पाय पडून त्यांच्या पायांना गंभीर दुखापत होत असल्याचेही काही प्राणीप्रेमींकडून सांगण्यात आले आहे.
प्राण्यांकडून वाहनांचे नुकसान होत असले तरी रहिवाशांनी अशा प्रकारे खिळे असलेले पाट ठेवून कठोर भूमिका घेणे हे चुकीचे आहे. त्याऐवजी प्राण्यांच्या जिवाला धोका पोहोचणार नाहीत अशा उपाययोजना करण्यास नागरिकांनी प्राधान्य देणे गरजेचे आहे.
आदित्य पाटील,
अध्यक्ष, वाईल्ड लाईफ वेलफेअर असोशिएशन