डोंबिवली- कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील सुमारे ४० हून अधिक नगरसेवकांनी शुक्रवारी शिंदे गटाला समर्थन दिल्याने पालिका हद्दीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर डोबिवली, कल्याण, उल्हासनगर मधील शिवसेनेमध्ये एकजूट राहावी यासाठी मातोश्रीवरून या भागातील शिवसैनिकांना शनिवारी बोलविण्यात आले होते. शिवसेनेतील जुने जाणते निष्ठावान महिला, पुरुष सुमारे ५०० हून अधिक शिवसैनिक मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.

डोंबिवली, २७ गाव ग्रामीण भागातील सुमारे ५०० शिवसैनिक एकावेळी मातोश्रीवर पोहचल्याने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. सध्याच्या अवघडल्या परिस्थितीत आपण ठाम राहून माझ्या पाठीशी ठाम राहिले आहात याबद्दल मला अभिमान आहे. यापुढील काळात कोणत्याही आणि कोणाच्याही दबावाला बळी पडू नका. एकजुटीने काम करा. पक्ष संघटना वाढवा आणि नवीन कार्यकारिणी तयार करून नव्या जोमाने कामाला लागा. येत्या पालिका निवडणुका आपणास ताकदीने लढवायच्या आहेत, असा सल्ला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निष्ठावान शिवसैनिकांना दिला.

डोंबिवलीतून अनेक शिवसैनिक लोकलने तर काही आपल्या वाहनाने मातोश्रीवर पोहचले. रेल्वेने गेलेल्या शिवसैनिकांनी भगवे झेंडे हातात घेतले होते. रेल्वे स्थानकात आणि लोकलमध्ये शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. डोंबिवली, ग्रामीण भागातून मातोश्रीवर जाणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती. डोंबिवली, कल्याणमधील अनेक नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल झाले असले तरी तळाचा जुना निष्ठावान कार्यकर्ता आपल्या पाठीशी ठाम आहे, हे शनिवारच्या शिवसैनिकांच्या भेटीतून उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला दाखवून दिले असल्याचे समजते.

शनिवारी मातोश्रीवर गेलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तात्यासाहेब माने, किशोर मानकामे, युवा शाखाधिकारी मंदार निकम, विवेक खामकर, महिला आघाडी प्रमुख कविता गावंड, वैशाली दरेकर, माजी महापौर अनिता दळवी, आरती मोकल, अरविंद बिरमोळे, प्रकाश तेलगोटे, प्रसाद टुकरूल, किरण मोंडकर, सतीश मोंडकर, अभय घाडिगावकर, ममता घाडिगावकर, संजय मांजरेकर असे अनेक पदाधिकारी मातोश्रीवर उपस्थित होते.