ठाणे – जिल्ह्यातील लंपी आजाराची लागण झालेल्या जनावरांची संख्या २६ इतकी झाली आहे. यामध्ये भिवंडी, शहापूर आणि बदलापूर तालुक्यातील जनावरांचा समावेश आहे. लंपीची लागण झालेले जनावर आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित जनावरांच्या पाच किलोमीटरच्या परिघात ७ हजार ७६ जनावरांची नोंद झाली असून यातली ७ हजार नऊ जनावरांना लंपीची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

हेही वाचा : लम्पीवरील औषधे, लस खरेदीसाठी ५० लाखांचा निधी

राज्यातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील जनावरांना देखील या रोगाची लागण झाल्याची माहिती चार दिवसांपूर्वी समोर आली होती. आठवड्याच्या सुरुवातीला लागण झालेल्या जनावरांची संख्या ही सहा इतकी होती. मागील चार दिवसांच्या कालावधीत यात वाढ झाली असून लंपीची लागण झालेल्या जनावरांची संख्या २६ इतकी झाली आहे. यात भिवंडी तालुक्यातील १३, शहापूर तालुक्यातील ११ आणि बदलापूर तालुक्यातील दोन जनावरांचा समावेश आहे. ज्या परिसरातील जनावरांना लंपीची लागण होत आहे तेथील पाच किलोमीटरच्या परिघातील गायवर्गातील सर्व जनावरांना लंपीची प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून केले जात आहे. या पद्धतीने जिल्ह्यात बाधित जनावरांच्या पाच किलोमीटरच्या परिघात आतापर्यंत ७ हजार ७६ जनावरांची नोंद झाली आहे. यापैकी ७ हजार नऊ जनावरांना लंपीची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण गायवर्गातील जनावरांची संख्या ही सुमारे ८० हजाराच्या घरात आहे. यासर्व प्राण्यांची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांच्या मालकांना पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच या प्राण्यांना चारा न खाणे, ताप येणे, अंगावर ठिकठिकाणी गाठी होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास त्यांना लागलीच नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात न्यावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी समीर तोडणकर यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lumpy preventive vaccination seven thousand animals completed number animals infected lumpy 26 ysh