डोंबिवली – डोंबिवली, २७ गाव परिसरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी सराईत २४ गुंडांना अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याने कारवाई केली आहे. याशिवाय नऊ संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडून काढण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे.
पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुंडगिरीच्या बळावर अवलंबून असलेल्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक कारवाई सुरू केली आहे. रामनगर, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या मोहिमेत सहभागी आहेत.
धमकावून पैसे उकळणे, घरात घुसून मारणे, अपहरण, व्यापारी, विकासकांना धमकावणे असे प्रकार गेल्या वर्षभरापासून वाढले आहेत. हे वाढते प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आता गुंडांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. शहर परिसरातील गुंड हे प्रकार करत असल्याने पोलिसांनी त्यांची माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. यामधील काही गुंडांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्याने कारवाई केली आहे.
हेही वाचा – ठाणे जिल्हातील बाजार समिती निवडणुकीत १४६ उमेदवार; युती, आघाडीत बिघाडी
रमेश जोशी (३५), तुषार पवार , बाबर अली, गुलाम अली, सुनील फुलोरे, आशीष श्रीवास्तव, चंद्रकांत जमादार हे टोळी प्रमुख आणि त्यांच्या एकूण २४ साथीदारांवर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली आहे. या गु्न्हेगारांवर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुन्हे पोलिसांना आढळून आले आहेत. ही कारवाई यापुढे अशीच जोमाने सुरू ठेवली जाणार आहे, असे साहाय्यक पोलीस आयक्त कुराडे यांनी सांगितले.