आतापर्यंत आयुष्यात मी ऐंशी – नव्वद पुस्तके लिहिली, परंतु माझ्या हयातीत माझ्यावरच लिहिलेले पुस्तक म्हणजे माझ्या नावाने ओळखले जाणारे हे उद्यान आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारापेक्षा हा सन्मान मोठा आहे, अशा भावना ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केल्या.
अंबरनाथ नगरपालिकेतर्फे साकारण्यात आलेल्या पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कल्पकता, योजकता यांचा सुरेख मिलाफ साधत साकार केलेले हे उद्यान खूप सुंदर असून हा माझा अपूर्व व अभूतपूर्व सत्कार आहे. त्यामुळे मी आजन्म अंबरनाथकरांचा ऋणी राहिन, असेही ते म्हणाले.
ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक सुनील चौधरी, आमदार बालाजी किणीकर ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, शाहीर संभाजी भगत, किरण येले, प्रदीप ढवळ, शशिकांत तिरोडकर, दिनेश बावरा आदी साहित्यिक मंडळी व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उद्यानात रंगले कविसंमेलन
उद्यानाचे उद्घाटन झाल्यानंतर तिथे कविसंमेलन रंगले. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रामदास फुटाणे यांनी त्यांच्या पहिल्याच कवितेतून ‘भारत व इंडिया’ यातील फरक उलगडला. आपल्या पहाडी आवाजात शाहीर संभाजी भगत यांनी माझे गं माय, जीव एकटा एकटा हे पोवाडे सादर केले. इथे दूर गावात भारून आली ही महेश केळुस्करांची कविता आणि छातीत फुले फुलण्याची वेळ निराळी होती व महाराष्ट्राच्या इतिहासातील एक केशरी लाट ही बाळासाहेबांवरची कविता अरुण म्हात्रे यांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. नेहमीप्रमाणेच आपल्या वेगळ्या शैलीत कविता सादर करत अशोक नायगावकर यांनी सर्वांनाच पोट धरून हसवले. त्यांच्या टिळक तुम्ही चौपाटीवर कशासाठी उभे आहात आणि गळ्याशी नाक खूपसून या दोन कविता अंबरनाथकरांची दाद मिळवून गेल्या.

असे आहे साहित्य उद्यान
* पद्मश्री मधू मंगेश कर्णिक साहित्य उद्यानात मराठी साहित्यातील शंभर साहित्यिकांवरील लेखनांश व माहिती मिळणार आहे.
* बाल साहित्य, किलबिल कट्टा तसेच भारतरत्न व ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचीही माहिती येथे मिळणार आहे.
* त्याचबरोबरीने व्यंगचित्रे, साहित्यिकांची छायाचित्रांसह यादी या उद्यानात पहावयास मिळणार आहे.
* अत्यंत प्रशस्त असलेल्या या उद्यानात छोटेखानी कार्यक्रमांचे आयोजनही करता येणार आहे.
* उगवत्या पिढीला मराठी साहित्य व साहित्यिकांचा परिचय व्हावा या हेतूने या उद्यानाची अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे निर्मिती केल्याचे नगराध्यक्ष सुनिल चौधरी म्हणाले.

Story img Loader