‘जे अपेक्षेने उघडले जाते आणि जे मिटताना काही तरी उपयोग झाल्यासारखे वाटते ते चांगले पुस्तक’, असे अर्माल अस्कोट म्हणतात. चांगल्या पुस्तकांची ही व्याख्या अतिशय चपखल आहे. चांगली पुस्तके व्यक्तीच्या सहवासात आली, की त्या व्यक्तीची बौद्धिक आणि मानसिकदृष्टय़ा चांगली प्रगती होते. त्यामुळे वाचनाचा छंद जडलेले अनेक जण आवडीच्या पुस्तकांचा संग्रह करू लागतात. कृष्णकांत ताटे आणि त्यांच्या सहचारिणी छाया ताटे हेही एक पुस्तकप्रेमी दाम्पत्य. गेली ३९ वर्षे ठाण्यात प्रशांत लायब्ररी या नावाने त्यांनी आपल्या संग्रहातील पुस्तकांचा खजिना वाचकांना उपलब्ध करून दिला आहे. या सुखवस्तू कुटुंबाने चांगल्या हुद्दय़ावरील नोकरी आणि दोन अपत्यांना सांभाळून त्यांच्या संग्रहातील वाङ्मय भांडार इतर वाचकांनाही उपलब्ध व्हावे म्हणून विष्णूनगरमध्ये ३० मे १९७६ रोजी प्रशांत लायब्ररी हे खासगी ग्रंथालय सुरू केले. पहिल्याच दिवशी या ग्रंथालयाचे शंभर सभासद झाले. यावरून या परिसरात ग्रंथालयाची किती गरज होती, हे लक्षात येते. सध्या प्रशांत लायब्ररीने विष्णूनगर परिसरातील चोखंदळ वाचकांना पुस्तकांचे मोठे भांडारच उपलब्ध करून दिले आहे.
अगदी चार-पाच टेबलेच दाटीवाटीने राहतील इतकी लहान जागा, पण ग्रंथालयात प्रवेश केल्यावर चोहुबाजूंनी आपल्याला पुस्तकांचाच भरणा पाहायला मिळेल. मोठय़ा ग्रंथालयासारखे इथे पुस्तकांचे वेगळे विभाग नाहीत. सभासदांनी त्यांना हवे असलेले पुस्तक सांगावे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना ते द्यावे असे बंधनही नाही. सभासद या कुटुंबातील सदस्यासारखा असतो. त्यांना स्वत:हून हवे असलेले पुस्तक घेण्याचे स्वातंत्र्य येथे दिले जाते. वाचकांनी पुस्तकांशी मैत्री करावी, असे ताटे दाम्पत्याला वाटते. त्यामुळे पुस्तक आणि वाचक यामध्ये तिसरा कुणीही येणार नाही, याची काळजी येथे घेतली जाते. प्रत्येक पुस्तकाला, मासिकाला येथे छानपैकी कव्हर घातले जाते. त्यामुळे ती अधिक आकर्षक आणि टापटीप दिसतात. कोणतेही नवे पुस्तक अथवा मसिक आले की आम्ही सर्वात आधी त्याला कव्हर घालतो, अशी माहिती येथील सेविका प्रतिभा गायकर यांनी दिली.
वैविध्यपूर्ण पुस्तके हे प्रशांत लायब्ररीचे वैशिष्टय़ आहे. मराठी आणि इंग्रजीतील नवी-जुनी अनेक पुस्तके येथे पाहायला मिळतात. लहान मुलांसाठी ‘द सिक्रेट सेव्हन’, हार्डी बॉयस’सारख्या जुन्या इंग्रजी कथासंग्रहांची पुस्तके आजही या लायब्ररीत घर करून आहेत. लहान मुले किंवा तरुणांच्या कायमच आवडीचा ‘हॅरी पॉटर’च्या कथांचा मराठीतील अनुवाद संग्रहात आहे. तसेच इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये जेम्स पेटरसनची ‘एलेवन्थ अवर’, जेम्स डीवरची ‘द बर्निग वायर’ तर शिवा ट्रायोलोजीवर आधारित असलेल्या रहस्यमय ‘मेनुहा’, ‘नागाज’, ‘वायुपुकल’ या लोकप्रिय कादंबऱ्या येथे आहेत. सुरुवातीच्या काळात मराठी पुस्तकांना अधिक मागणी होती. मात्र आता काळानुसार लोकांची वाचनाची आवडही बदलली. त्यामुळे कालांतराने मराठी पुस्तकांसोबतच इंग्रजी पुस्तके, मासिकेही येथे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून दिली जाऊ लागली. बिझनेस टुडे, फेमिना, आऊटलूक, रीडर्स डायजेस्ट आदी अनेक मासिके लायब्ररीत आहेत. या मासिकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद असल्याचा व्यवस्थापनाचा अनुभव आहे. एकीकडे इंग्रजी पुस्तके/मासिके यांना चांगला प्रतिसाद मिळत असताना मराठी वाचकसंख्या रोडावत चालल्याची खंत प्रतिभा गायकर यांनी व्यक्त केली. पूर्वी दिवाळी-उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुले वाचनालयात रमत. आता फारशी मुले लायब्ररीकडे वळताना दिसत नाहीत. किशोरवयीन तसेच तरुणांच्या उपयोगी ठरतील, अशी शेकडो पुस्तके वाचनालयात आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या तसेच अनुभवाच्या कक्षा रुंदाविण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या. अनेक उत्तम पुस्तके येथे आहेत. सौदीमधील स्त्रियांवरील अत्याचारावर प्रकाश टाकणारे डॉ. उज्वला दळवी यांचे ‘सोन्याच्या धुराचे चटके’ हे पुस्तक आपल्याला सामाजिक पातळीवर विचार करायला भाग पाडते. शांता शेळके, द.मा. मिरासदार, आचार्य अत्रे, व.पु. काळे, जी.ए. कुलकर्णी, गो.ना. दातार यांसारख्या जुन्या लेखकांसोबतच अनेक नवीन लेखकांची पुस्तके लायब्ररीत येत असतात.
गरज जबाबदार वाचकांची :
अनेक वेळा वाचक पुस्तकातील किंवा मासिकातील त्यांना आवडलेला लेख, मजकूर फाडून घेतात. त्यामुळे अर्थातच त्या पुस्तकाचे वाचनमूल्य कमी होते. पुस्तक चोरीला जाणे, किंवा नेलेले पुस्तक वेळेत आणून न देणे यामुळे लायब्ररीचे नुकसान होते. पुस्तके ही आपली आयुष्यभराची सोबती असतात. त्यांचे जतन करणे ही
वाचक म्हणून आपली जबाबदारी आहे, अशी भावना प्रत्येक वाचक सभासदाने ठेवल्यास वाचन संस्कृती अधिक सुदृढ होण्यास निश्चितच मदत होईल.
येत्या ३० मे रोजी ३९ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रशांत लायब्ररीत ३० हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे. सभासदांसाठी ३०० रुपये मासिक वर्गणी असून सकाळी ८.३० ते १२.३०, तर संध्याकाळी ४ ते ८.३० या वेळेत लायब्ररी वाचकांसाठी खुली असते. ‘सहज याल, रमाल आणि कायमचे मित्र होऊन जाल पुस्तकांचे आणि आमचेही’ या प्रशांत लायब्ररीच्या घोषवाक्याला मनात घेऊन येथील वेगवेगळ्या पुस्तकांचा आस्वाद नक्कीच अनुभवायला हवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा