कल्याण – कल्याणमधील गौरीपाडा येथील एक लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्मार्ट सिटी विभागाने सीटी पार्क विकसित केले आहे. मनोरंजन, विरंगुळ्याचे प्रशस्त ठिकाण यानिमित्ताने कल्याण शहराच्या वेशीवर उपलब्ध झाले आहे. मनोरंजनासाठी फिरायला कुठे जायाचे ही कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांची अडचण सीटी पार्कमुळे दूर झा्ली आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे वालधुनी नदीच्या काठी टाऊन पार्क या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर सीटी पार्क विकसित करण्यात आले आहे. ६९ कोटी ६६ लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. नवी दिल्लीतील मेसर्स डिझाईन ॲकाॅर्ड या समंत्रक संस्थेच्या प्रकल्प अहवालानुसार सीटी पार्कची उभारणी करण्यात आली आहे. कल्याण शहरातील नागरिकांना आतापर्यंत काळा तलाव, दुर्गाडी गणेश घाट हीच विरंगुळ्याची ठिकाणे होती. गणेश घाट भागात आधारवाडी कचराभूमीची दुर्गंधी येत असल्याने नागरिक या भागात आरोग्याचा विचार करून पाठ फिरवतात. घरी पाहुणा आला तर त्याला फिरायला कुठे न्यायचे अशी अडचण कल्याणमधील नागरिकांची होती. ही अडचण सीटी पार्कमुळे दूर होणार आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी कल्याणमध्ये, विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण
पार्कमधील सुविधा
सीटी पार्कमध्ये तलाव असणार आहे. उंच ठिकाणी बसून परिसर पाहता येईल अशी सुविधा आहे. विविध पद्धतीची हिरवळ भौगोलिक रचनेप्रमाणे येथे बसविली जाणार आहे. एक हजार मीटर लांब, चार मीटर रुंदीचा चलत मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. लहान सिनेमा गृह, उपहारगृह, लहान मुलांसाठी स्वतंत्र मनोरंजन मैदान, खेळणी, मेजवानी ठिकाण, वालधुनी नदी किनारा ते पार्कच्या भागात उंच भराव आणि विद्युत रोषणाई. सीटी पार्कमध्ये येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ सुविधा आहे.
सीटी पार्कला पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका नको म्हणून वालधुनी नदी काठ परिसरात उंच संरक्षित भिंत बांधली जाणार आहे. पूर रेषेपर्यंत भराव घालून सीटी पार्क संरक्षित केला जाणार आहे. बारमाही सीटी पार्कचा नागरिकांना लाभ घेता आला पाहिजे, अशी रचना याठिकाणी करण्यात आली आहे. प्रकल्प निसर्ग रम्य दिसण्यासाठी बाराशे वृक्ष लावण्यात आले आहेत. यामध्ये देशी प्रजातीची पसारा असणारी १२ झाडे लावण्यात आली आहेत.
हेही वाचा – पैसे दिले नाही म्हणून कल्याणमध्ये चालकावर हल्ला
नागरिकांना आपल्या शहरात मनोरंजनाची प्रशस्त सुविधा उपलब्ध व्हावी या विचारातून सिटी पार्कची उभारणी करण्यात आली आहे. या पार्कचे उद्घाटन झाल्यानंतर पार्क देखभाल नियोजनासाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडे हस्तांतरित केला जाईल. – प्रल्हाद रोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण.