तिकीट दरांत वाढ करून प्रवाशांच्या खिशाला हात घालणाऱ्या ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचा (टीएमटी) प्रवास मात्र सध्या ‘फुकट’ सुरू आहे. इंधनाचे दर परवडत नाही म्हणून उपक्रमाच्या ताफ्यात ‘सीएनजी’ बसेसची वाढ करणाऱ्या टीएमटीने गॅसपुरवठय़ापोटी आलेले महानगर गॅस कंपनीचे १९ कोटी ६६ लाख रुपयांचे बिल मात्र थकवले आहे. त्यामुळे आधी थकबाकी द्या, मगच गॅसपुरवठा करू, असा इशाराच महानगर गॅसने टीएमटीला दिला आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविणे अद्याप टीएमटीच्या व्यवस्थापनाला जमलेले नाही. प्रवाशांच्या मोठी मागणी असूनही प्रभावी प्रवासी सुविधा पुरविण्यात पूर्णत: अपयशी ठरलेल्या टीएमटी व्यवस्थापनाने २००६पासून सीएनजीवर धावणाऱ्या बसगाडय़ांच्या खरेदीवर भर दिला. सीएनजी पंपाच्या माध्यमातून परिवहनच्या बसगाडय़ांना गॅसपुरवठा केला जात असून दिवसाला सुमारे ६ हजार किलो सीएनजी गॅस इंधन स्वरूपात परिवहन सेवेकडून वापरले जाते. यासाठी त्यांना दररोज २.९ लाख रुपये खर्च येतो. हे दर कमी असले तरी गेल्या नऊ वर्षांपासून टीएमटीने महानगर गॅसला एक दमडीही दिलेली नाही. परिणामी महानगर गॅसकडे असलेली टीएमटीची थकबाकी १९ कोटी ६६ लाखांवर पोहोचली आहे. थकबाकी कोटींच्या घरात जाऊनही टीएमटीकडून पैसे देण्याचे नाव निघत नसल्याने महानगर गॅसने आता थेट असहकाराचे अस्त्र उगारले आहे. आधीची थकबाकी न दिल्यास यापुढे टीएमटीला गॅसपुरवठा करणार नाही, असा इशारा कंपनीने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
परिवहनला होणारा गॅसपुरवठा खंडित झाल्यास याचा मोठा फटका टीएमटीच्या सेवेला आणि पर्यायाने प्रवाशांना बसणार आहे. प्रवाशांकडून वाहतुकीचे पैसे घ्यायचे मात्र ते इंधनासाठी खर्चच करायचे नाही, अशी भूमिका परिवहन प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे. गॅसपुरवठा खंडित झाल्यास प्रवाशांना या सुविधेपासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली असली तरी प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. या संबंधी परिवहन उपक्रमाचे महाव्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘या विषयावर नंतर बोलतो’ असे उत्तर त्यांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा