ठाणे/ कल्याण/ दिवा : ठाणे हे खोक्याचे केंद्रबिंदू आहे. या केंद्रबिंदूच्या बुडाला मशालीने आग लावली तर संपूर्ण राज्य गद्दारमुक्त होईल, अशी टीका करत गद्दारांना क्षमा नाही, हे आनंद दिघे यांचे संस्कार विसरू नका, असे आवाहन शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यातील सभेत बोलताना केले. तसेच मागच्या वेळी बिनशर्ट पाठिंबा देणाऱ्यांनी यंदा इनशर्ट पाठिंबा दिल्याचे सांगत मनसेची गुजसे म्हणजेच गुजरात नवनिर्माण सेना झाली आहे, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त

शिवसेना (ठाकरे गट) ठाणे शहर उमेदवार राजन विचारे, कोपरी- पाचपाखडीचे उमेदवार केदार दिघे, ओवळा- माजीवडाचे उमेदवार नरेश मनेरा, कल्याण ग्रामीणचे उमेदवार सुभाष भोईर, डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे, कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारासाठी शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी ठाणे, डोंबिवली आणि कल्याण येथे जाहीर सभा घेतल्या.

मुंबई महापालिकेत त्यांच्या कंत्राटदार मित्राला पाऊल ठेवू दिले नाही म्हणून त्यांनी माझे सरकार पाडले, असा दावा करत ‘केलंय काम भारी, लुटली तिजोरी, आता पुढची तयारी,’ अशी टीका त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या जाहिरातबाजीवरून केली. मर्दाची अवलाद असाल तर माझे वडील बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची छायाचित्रे वापरू नका, स्वत:च्या वडिलांची छायाचित्रे वापरून निवडून येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. काहीजण चोरून वारसदार झालेत, परंतु मी आणि केदार दिघे असे आम्ही दोघे रक्ताचे आणि विचारांचे वारसदार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.

निष्ठा, स्वाभिमान नावाचा प्रकार आताच्या भाजपमध्ये राहिलेला नाही. लोकांची घरे फोडणारे, पेटवणाऱ्या भाजपच्या राजकीय गर्भात आता इतर पक्षांची बिजे आहेत. त्यामुळे आताचा भाजप हा संकरित भाजप झाला आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली. यापूर्वीच्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन पक्ष, संघटना वाढविण्यासाठी घरदार सोडले. अनेक जण अविवाहित राहिले. आताचे भाजपमधील चित्र पाहिले तर याच संकरित भाजपसाठी संघ, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपले आयुष्यपणाला लावले का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 uddhav thackeray slams shinde shiv sena mla in thane rally print politics news zws