ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी पाय घसरुन जखमी झाली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीसाठी धाव घेतली. एकनाथ शिंदे यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्याची विचारपूस करत तिला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही दिले. इतकंच नाही तर त्यांनी स्वत: ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
ठाणे अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरु होती. यावेळी रुपाली साळुंखे या महिला पोलीस कर्मचारी तिथे तैनात होत्या. बैठक उरकून मुख्यमंत्री निघत असतानाच रुपाली साळुंखे यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने त्या खाली पडल्या. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबद्दल कळताच त्यांनी रुपाली साळुंखे यांची विचारपूस केली, तसंच त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. आपण डॉक्टरांशी बोलते असंही त्यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांनी १० जुलैला आषाढी एकादशी असल्याने वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना टोलमाफीची घोषणा केली आहे. या वाहनांनावर स्टिकर चिकटवावेत आणि स्थानिक पोलिसांकडे त्यांची नोंद करावी असा आदेश त्यांना मुख्य सचिवांना दिला आहे.