मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याील ‘गडकरी रंगायतन’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ‘रंगाई’ या खास दिवाळी अंकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले होते’ असा टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे यांनी यावेळी ‘आपलं सगळं काही उघड असतं’ असं सांगताच मंचावरुन ‘बेधडक’ असा आवाज देण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तुम्ही हा शब्द आता शोधून काढलात अशी मिश्कील टिप्पणी केली.

शरद पोंक्षेंनी CM एकनाथ शिंदेंसमोर काढली बाळासाहेबांची आठवण, ‘त्या’ अग्रलेखाची आठवण करुन देत म्हणाले “ती शिवसेना…”

“कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत, पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले आहेत. त्याचा आवाज आजही घुमतोय. आमचे हितचिंतक आजही त्या फटक्याच्या आवाजांचं डेसिबल मोजत आहेत. त्यांना मोजू देत, काही समस्या नाही,” असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी लगावला.

शरद पोंक्षेंनी काढली बाळासाहेबांची आठवण

अभिनेते शरद पोंक्षेही यावेळी उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की “करोनाच्या काळात २०२१ मध्ये माझ्या आयुष्यातील पहिलं पुस्तक ‘मी आणि नथुराम’ प्रकाशित झालं. ‘मी नथुराम गोडसे’ नाटक करत असताना बाळासाहेब ठाकरे ठामपणे नथुरामच्या पाठीशी उभे राहिले होते. १७ जुलै १९९८ रोजी त्यांनी ‘नथुराम बोलला तर काँग्रेसच्या पोटात का दुखतं?’ असा अग्रलेख ‘सामना’त लिहिला होता. तो अग्रलेख या पुस्तकात छापण्यात आला आहे”.

एकनाथ शिंदेंचं कौतुक

“ती बाळासाहेबांची शिवसेना आणि त्याचे आजचे प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत. पुस्तकात आनंद दिघे कसे पाठीशी उभे राहिले, बाळासाहेबांनी ती लढाई कशी लढली आणि आमचं नाटक केंद्र सरकारविरोधातील लढाईत कसं जिंकलं याचे अनंत किस्से आहेत,” असंही शरद पोंक्षे यांनी सांगितलं.

“मी काही लेखक नाही, त्यामुळे माझे पुस्तक कोणी वाचेल असं वाटलं नव्हतं. पण हे बेस्ट सेलर पुस्तक ठरलं. दिवाळीपर्यंत १० आवृत्त्या संपल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde thackeray faction diwali pahat thane sgy
Show comments