ठाणे : शिंदे आणि फडणवीस सरकार राज्याला भिकारी केल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका करत देशात आगामी निवडणुका बॅलेट किंवा मतदान यंत्र पद्धतीने झाल्या तरी त्यात भारतीय जनता पार्टी हारेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून मोठा गाजावाजा करत आयोध्येला जाता आणि तिथे जाता म्हणजे पाकिस्तानवर वार करायला नाही चालले, अशी टिकाही त्यांनी केली. या मंदिराचे भूमिपूजन दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केल्याचेही आठवण करून देत अयोध्या मंदिरावर जास्त अधिकार काँग्रेसचा आहे. येथील महंतानी आम्हालाही निमंत्रण दिले असून आम्हीही आयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दिव्यात भाजप आणि शिंदेगटात धूसफूस ?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या रमाकांत मढवी यांच्यावर थेट आरोप

ठाणे येथील गडकरी रंगायतन नाट्यगृहामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुथ्वीराज चव्हाण तसेच बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टिका केली. ठाणे महापालिका क्षेत्रात रंगरंगोटीच्या कामावर ४५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. हे काम केवळ ५० ते ६० कोटी रुपयांचे आहे. तरीही त्यावर इतका खर्च करण्यात येत आहे. तसेच जी-२० परिषदेच्या खर्चाचा हिशोब घेण्यात येणार नाही. त्यामुळे त्यावर हजारो  कोटी रुपये खर्च केले जात आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे. महागाई वाढली आहे. औषधे महागल्याने गरिबांना उपचार खर्च परवडत नाही. त्याकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारकडे वेळ नाही. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे, अशी टिका त्यांनी केली.

हेही वाचा >>> भास्कर जाधवांकडून चंद्रशेखर बावनकुळेंची तुलना वेस्ट इंडिजच्या ‘या’ खेळाडूबरोबर; म्हणाले…

ठाण्यातच नव्हे तर, राज्यातच कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. हे असंविधानिक सरकार आहे. त्यामुळे या सरकारचा कुठलाही वचक प्रशासनावर नाही. ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना धमकीचे फोन आले. तर, कार्यकर्ते गिरीश कोळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याची साधी पोलिसांनी तक्रार सुद्धा घेतली नाही. मी स्वत: देखील पोलीस आयुक्तांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी देखील भेटण्यास आले होते. त्यावेळी त्यांना गुन्हे दाखल करून घेण्यास देखील सांगितले. मात्र, अद्यापही त्याची दाखल घेतली नाही. तसेच ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर देखील हल्ला झाला. या वाढत्या घटनांमुळे ठाणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या ठाण्यातील मुख्यमंत्री आहे, त्या ठाण्यातच कायदा सुव्यवस्थ बरोबर नसेल, तर, संपूर्ण महराष्ट्रात काय परस्थिती असेल याची जाणीव या निमित्ताने होते, असेही ते म्हणाले. ठाणे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. याठिकाणी पूर्वीप्रमाणे काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहील. त्यादृष्टीने कामाला लागा असे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी येथे दिसतील, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये ‘सुस्थितीत’ रस्त्यांवरील साडे सात कोटी खर्चाची उधळपट्टी आयुक्तांनी रोखली, नस्ती गायब करण्याचे प्रयत्न, शिपाई निलंबित

बैठकीत झाले हे ठराव आदाणी कंपनीमध्ये गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे आणि मोदी-अदानी यांचा संबंध काय? हे दोन प्रश्न राहुल गांधी यांनी विचारले आहेत. यासंदर्भात त्यांनी संसदमध्ये आवाज उठविला. त्यामुळेच मोदी सरकारने त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करत त्यांची खासदारकी रद्द केली. या कारवाईच्या निषेधाचा ठराव बैठकीत करण्यात आला. केंद्रात सरकार आल्यानंतर ओबीसी जातीनिहाय जनगणना करून वेगळे मंत्रालय सुरु करणे आणि त्यामाध्यमातून आर्थिक तरतुद करणे, असा ठराव करण्यात आला. मालेगाव आणि औरंगाबादमध्ये वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. निवडणुक काळातच असे का होते, याचा विचार नागरिकांनी करावा आणि द्वेषात न पडता सर्वांनी एकत्रित रहावे, असाही ठराव करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात बलिदान देणाऱ्यांची माहिती घराघरात पोहचविणे,  राहुल गांधी यांच्यावरील अन्याय कारवाईविरोधात जय भारत सत्याग्रहाच्या माध्यमातून देशभर मोदी सरकार विरोधात आवाज उठवला जात असून सत्याग्रहाच्या माध्यमातून जनतेपर्यंत राहुल गांधी यांच्यावर झालेली अन्यायकारक कारवाई आणि मोदी-अदानी महाघोटाळ्याची माहिती पोहचवा, असाही ठराव करण्यात आला. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे, असाही ठराव करण्यात आला, अशी माहिती पटोले यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra congress chief nana patole slams shinde fadnavis government for bad governance zws