ठाणे : संकटाच्या काळात जे पक्षाला सोडून गेले, त्यांना जाऊ द्या. पक्षाला काही फरक पडत नाही, असे सांगत पक्षाचा कणा असलेला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मुख्य प्रवाहाशी जोडून जोमाने काम करायचे आहे. येणारे दिवस हे काँग्रेस चे आहेत, असे विश्वास काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व ठाणे प्रभारी शरद अहेर यांनी शनिवारी ठाण्यात कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्यस्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्याकरीता पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय जिल्हावार निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरिक्षकांकडून जिल्ह्यात जाऊन बैठका घेतल्या जात असून त्यात ते पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. याशिवाय, त्यांना पक्ष वाढीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. अशाचप्रकारे ठाणे काँग्रेसची आढावा बैठक पाचपखाडी येथील ज्ञानराज सभागृहात शनिवारी पार पडली. यावेळी उपस्थित असलेले प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नवनियुक्त निरीक्षक झीशान हुसेन, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेस पक्षाची वाटचालीचे सादरीकरण करून आजपर्यंत केलेली आंदोलने, निषेध मोर्चे मासिक बैठका याची सचित्र माहिती विशद केली.

येणारे दिवस काँग्रेसचे

काँग्रेस हा सर्वसामान्यांचा आणि सर्व धर्म समूहाचा विचार मांडणारा पक्ष आहे. गांधी विचारसरणीची, सर्वसामान्य व्यक्ती हर्षवर्धन सकपाळ हे आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. संकटाच्या काळात जे पक्षाला सोडून गेले, त्यांना जाऊ द्या. पक्षाला काही फरक पडत नाही, असे प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले. पक्षाचा कणा हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याने मुख्य प्रवाहाशी जोडून जोमाने काम करायचे आहे. येणारे दिवस हे काँग्रेस पक्षाचेच आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

एकजुटीने काम करा मी प्रदेश काँग्रेस आणि आपल्या मधील दुवा म्हणून येथे आलो असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहे. तुमचे म्हणणे सूचना मी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी आलो आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्याना नव्या उमेदीने आणि एकजुटीने काम करावे असे आवाहन डॉ झीशान हुसेन यांनी केले. काँग्रेसचे निरीक्षक म्हणून ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. तसेच दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉक स्तरावरील बैठका घेणार असून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.