ठाणे – राज्य सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शाळांमध्ये मार्च ऐवजी एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या अनपेक्षित बदलामुळे अनेक शाळांना त्यांच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात सुधारणा करावी लागली, ज्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परिक्षा संपणार म्हणून पालकांनी सुट्टीचे नियोजन केले होते. परंतू, ऐनवेळी परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च अखेरीस किंवा एप्रिल महिन्यामध्ये शाळास्तरावरुन घेण्यात येतात. यामध्ये प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे दिसून येते. त्यात, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परिक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरु असल्या तरी, विद्यार्थ्यांची पुरेशी उपस्थिती नसल्याचे दिसते.

त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी उपलब्ध वेळेचा पुरेपुर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत सर्व जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी वर्गाच्या वार्षिक परिक्षा आणि नियतकालीक मूल्यांकन २०२४-२५ साठी वेळापत्रक सादर केले आहे. शिक्षण विभागाकडून आलेल्या वेळापत्रकानुसार परिक्षेचे नियोजन करण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले.

हे परिपत्रक येण्यापूर्वी शाळांनी परीक्षा वेळापत्रक निश्चित केले होते. त्यानुसार, पालकांनी देखील सुट्टीचे नियोजन केले होते. परंतू, अचानक शाळेकडून पुन्हा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे पालकांचे सुट्टीचे नियोजन बिघडले आहे. या निर्णयामुळे अनेक पालक नाराज असून, संतप्त प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.

पालक प्रतिक्रिया

नवी मुंबई येथील ऐरोली परिसरात असलेल्या एका खासगी शाळेत सुरुवातीला २४ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत परिक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले होते. ६ एप्रिल पासून शाळेला सुट्टी मिळणार होती. परंतू, अचानक शाळेकडून सर्व पालकांना व्हॅाटस अप ॲप द्वारे संदेश पाठविण्यात आले की, सरकारच्या परिपत्रकानुसार शालेय परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

लेखी परीक्षा २९ मार्च ते १५ एप्रिल या कालवधीत परीक्षा घेतली जाणार असून त्यानंतर, १६ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधील नेहमीप्रमाणे वर्ग चालू राहतील. ६ एप्रिल ला परिक्षा संपणार म्हणून आम्ही गावाला जायचे नियोजन केले होते. त्यासाठी गाडीची आगाऊ नोंद केली होती. शाळेच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे आमचे नियोजन पूर्णपणे बिघडले आहे, अशी प्रतिक्रिया या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तर, शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाची पूर्व सूचना पालकांना दोन ते तीन महिन्यापूर्वी देणे गरजेचे होते. ऐन वेळी झालेल्या वेळापत्रकातील बदलामुळे सुट्टीचे नियोजन बिघडलेच त्यासह, पालकांना आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागले, अशी प्रतिक्रिया ठाण्यातील एका शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकाने दिली.