ठाणे : राज्यात उद्योगांना लाल गालिचे अंथरले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात दळणवळणाची सुविधा आहे. कुशल कामगार आहेत. आपण सकल राष्ट्रीय उत्पन्नात, उद्यमींमध्ये प्रथम आहोत. अर्थव्यवस्थेत देखील आपली स्थिती इतर राज्यांपेक्षा चांगली आहे. विदेशी गुंतवणूकदार राज्यात येत आहेत कारण येथील वातावरण चांगले आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

गुढीपाडव्या निमित्ताने ठाण्यात शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. या यात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या सरकारने दोन-तीन महिन्यांपूर्वीच विजयाची गुढी उभारली. ही गुढी विकासाची, समृद्धी, लाडक्या बहिणींची, लाडक्या शेतकरी, लाडक्या भावांची गुढी आहे. भविष्यामध्ये राज्यासाठी विकासाचे पर्व आणले आहे. त्यास आणखी वेगाने पुढे न्यायचे आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.

ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, चांगले खवय्ये आहेत, चविष्ठ पदार्थ येथ मिळतात आणि चांगले राजकारणी देखील येथेच आहेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले. ठाण्याचा विकास होत आहे. आमचा अजेंडा फक्त विकास आहे. १५ वर्षांपूर्वीची मुंबई आणि आताची मुंबई बदलली आहे. मुंबईचा विकास होत आहे. मुंबईत चांगले रस्ते होत आहे. आम्ही मेट्रोच्या माध्यमातून दळणवळण सुविधा देत आहोत. शहरे वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले.

भारतातील १०० प्रभावशाली व्यक्तीमत्त्वांची यादी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये जाहीर झाली. या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. याविषयी एकनाथ शिंदे यांना विचारले असता, काम करतात त्यांचा क्रमांक येतो. जे घरी बसतात. त्यांचा खालून क्रमांक येतो अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आजचा दिवस टिका करण्याचा नाही, आम्ही विरोधकांनाही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो असेही एकनाथ शिंदे म्हणाले.