११३ हेक्टरवर आयआयटी दर्जाच्या संस्था

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईच्या वेशीवर आयआयएम, आयआयटी दर्जाच्या शिक्षण संस्था स्थापन व्हाव्यात यासाठी ठाणे महापालिकेने काही वर्षांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. खिडकाळीत ११३ हेक्टरवर आरक्षण बदलास राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली. पालिकेने तिथे शैक्षणिक केंद्र विकसित करण्याचा सविस्तर प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी सरकारकडे पाठविला होता.

उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक नामांकित संस्था मुंबई-पुण्यात तसेच बंगळुरू, हैदराबाद, दिल्लीत आहेत. सिडकोच्या विकास आराखडय़ानुसार नवी मुंबईतही नामांकित शिक्षण संस्थांचे जाळे विखुरले आहे. त्या तुलनेत ठाणे परिसरातही नामांकित शिक्षण संस्थांसाठी कवाडे खुली व्हावीत यासाठी ठोस प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अन्य शहरांची दारे ठोठवावी लागतात.

ठाण्यात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेने काही वर्षांपासून जागेचा शोध सुरू केला होता. पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी यासंबंधी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे बैठक घेतली होती. त्यानंतर शहरविकास विभागाने खिडकाळी येथील ११३ हेक्टर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर शिक्षण केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. खिडकाळी येथील या जागेवर क्रीडा संकुल तसेच हरित विभागाचे आरक्षण होते. शहर विकास विभागाने मांडलेल्या प्रस्तावानुसार सर्वसाधारण सभेने या ठिकाणी एज्युकेशन हबचा प्रस्ताव मंजूर करून राज्य सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.

विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गालगत उभारणी

* मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने विरार-अलिबाग दरम्यान बहुद्देशीय मार्गाची आखणी केली आहे. त्याला लागूनच खिडकाळी येथे ११३ हेक्टर मोकळी जागा आहे. या जागेवर एज्युकेशन हब उभारण्याचा प्रस्ताव ९ ऑक्टोबर २०१६ रोजी महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने जमीन अधिग्रहणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

*  ठाणे महापालिका अनेक नामांकित शिक्षण संस्थांच्या संपर्कात आहे, अशी माहिती शहर विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (पूर्वीची यूडीसीटी) या संस्थेने स्वारस्य दाखवले आहे. हरित क्षेत्राऐवजी शिक्षणासाठी आरक्षण झाल्यामुळे जमीन अधिग्रहणात शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल, असा दावा पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.