अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहराच्या एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला राज्य शासनाची मंजुरी मिळाली. आहे. १४८ कोटी ६८ लाख रूपये खर्चून ६०० मेट्रीक टन क्षमतेचा हा प्रकल्प बदलापूर पालिकेच्या कचराभूमीवर सुरू केला जाणार आहे. कचरा वर्गीकरण करून कचऱ्यानुसार त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच असा बंदिस्त कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीसासह पोलिसांना तीन भावंडांची धक्काबुक्की
घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान अनेक महापालिकांपुढे आहे. घनकचरा प्रक्रियेच्या नावाखाली अनेक मोठे प्रकल्प फसलेले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून या प्रकल्पांना विरोध होतो. मात्र ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा अत्याधुनिका घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवला जाणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने नुकतीच या १४८ कोटी ६८ लाख रूपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. शुक्रवारी स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. बदलापुरच्या वालिवली येथील सर्वे क्रमांक १८८ येथील २३ एकर जागेपैकी १३ एकर जागेत हा प्रकल्प उभा राहणार आहे. हा प्रकल्प बंदिस्त असणार आहे. येथे कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही. संकलित केलेला कचरा थेट प्रक्रिया यंत्रांमध्ये प्रक्रियेसाठी जाईल. त्यामुळे त्याचा नागरिकांना कसलाही त्रास होणार नाही, अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. हा प्रकल्प राज्यासाठी आदर्श प्रकल्प ठरेल अशीही आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. येत्या महिनाभरात याची निविदा प्रक्रिया राबवून वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा तीनही पालिकांचा मानस आहे. या कामी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कचराभूमीची जागा वापरली जाणार आहे. तर अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिका यासाठी आपले आर्थिक योगदानही देणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने फटकारल्यानंतर अंबरनाथ आणि उल्हासनगर पालिका अशा प्रकल्पाच्या प्रतिक्षेत होत्या. या पालिकांची कचराकोंडी फुटणार आहे.
असा असेल प्रकल्प
एकूण कचऱ्यातील ४५ टक्के ओल्या कचऱ्याचे कम्पोस्ट खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. राडारोडा, डेब्रीज या २२ टक्के कचऱ्याचा भूभराव करण्यासाठी वापरला जाईल. तर १३ टक्के प्लास्टीक, काचा आणि कापड यासारख्या कचऱ्यावर प्रक्रिया होईल. उरलेल्या २० टक्के आरडीएफ प्रकारातील कचऱ्याचे कांदा कोळसा या जास्त उष्मांक असलेल्या कोळशात रूपांतर केले जाणार आहे.