बदलापूरः कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी ५० टक्के खर्च उचलण्याची हमी देणारे पत्र राज्य सरकारने मंगळवारी तत्काळ रेल्वे बोर्डाला पाठविले. या पत्रामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामाला गती मिळण्याची आशा आहे. सोमवारी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत याबाबतची मागणी केली होती. त्यामुळे राज्य शासनाच्या वेगवान निर्णयाची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बहुतप्रतिक्षित कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. २०१९ साली हा मार्ग अधिकृतपणे घोषीत करण्यात आला होता. या कामासाठी आणि काम वेळेत होण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के खर्च उचलावा, अशी मागणी २०१९ मध्ये तत्कालीन खासदार कपिल पाटील यांनी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली होती. मात्र त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. गेल्या अडीच वर्षांत याबाबत कोणताही निर्णय घेतला गेला नव्हता. त्यामुळे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ५० टक्के खर्चाला मंजुरी देत त्यासाठी हमी पत्र रेल्वे बोर्डाला देण्याची मागणी केली होती. त्या मागणीला तत्काळ उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. त्यानुसार सोमवारी राज्य सरकारच्या गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव आर. एम. होळकर यांनी रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठवत ५० टक्के खर्चाची हमी घेतली आहे. २४ तासात झालेल्या या प्रक्रियेची आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात चर्चा रंगली आहे. त्याचवेळी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाचे सदस्य संजीव मित्तल यांना पत्र पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारने ५० टक्के खर्चाची शाश्वती दिल्यामुळे आता निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. निविदा मंजूर झाल्यानंतर कल्याण-मुरबाड रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दर्शविल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government letter for guaranteeing 50 percent cost for murbad railway line zws