कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदावर उत्तम पकड जमविलेल्या डाॅ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्हाधिकारीपदी नुकतीच निवड करण्यात आली. जाखड यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या महापालिका आयुक्तपदावर तीन दिवस झाले तरी कोणत्याही नव्या नियुक्तीची घोषणा राज्यसरकार स्तरावरून झाली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन बड्या नेत्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या शहरांमध्ये अजूनही कायमस्वरूपी आयुक्त मिळत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. या शहरांमध्ये शिंदे सेना आणि भाजपमधील संघर्ष यापूर्वीही लपून राहिलेला नाही. या संघर्षातून ही नियुक्ती रखडली आहे का अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

आतापर्यंत पद रिक्त झालेल्या प्रत्येक महापालिकेत शासनाकडून तात्काळ आयुक्त नेमण्यात आला. मग कल्याण डोंबिवली पालिकेत आयुक्त नेमणुकीसाठी शासन वेळकाढुपणा का करत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे आल्यापासून कल्याण डोंबिवली महापालिकेवर त्यांचे खासदार पूत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा वरचष्मा राहिला आहे.

शिंदे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत कल्याण डोंबिवली महापालिकेत तीन आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. यापैकी कुठेही चर्चेत नसलेल्या डाॅ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती अनेकांना चकीत करणारी होती. थेट सनदी सेवेतील डाॅ. जाखड या कडव्या शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मागील एक सव्वा वर्षांत त्यांनी महापालिकेच्या कारभारावर पकड देखील मिळविली होती.

डाॅ. श्रीकांत शिंदे यांना अपेक्षित असलेल्या विकास कामांचा वेग वाढावा यासाठी डाॅ. जाखड प्रयत्नशील होत्या. मात्र, कल्याण डोंबिवली शहरातील राजकीय व्यवस्थेपुढे डाॅ. जाखड यांना आपल्या कामाचा म्हणावा तसा ठसा उमटविता आला नाही. बेकायदा बांधकामे, वाढते फेरीवाले, वाहतुक कोंडीमुळे बेजार नागरिक या आघाडीवर डाॅ. जाखड पूर्वीच्या आयुक्तांप्रमाणेच, अनेकदा हदबल दिसल्या.

नवा अधिकारी नेमका कोणाचा कल्याण डोंबिवली शहरात आखीव रेखीव विकास व्हावा, स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे गतीने मार्गी लागावीत, इतर नागरी सुविधांचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी, प्रशासनावर कठोर शिस्तीने हुकमत ठेवणारा भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस) श्रेणीतील उमद्या वयोगटातील आयुक्त कल्याण डोंबिवली पालिकेत देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इच्छुक आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, या ठिकाणी राजकीय वरचष्मा राखायचा असेल तर आयुक्त आपलाच हवा असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा एकंदरीत कारभार पाहता या ठिकाणी थेट सनदी सेवेतील अधिकारी यायला फारसे इच्छूक नाही असे समजते. शिवसेना भाजप युतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका हद्द महत्त्वाची राहिली आहे.

या भागातील चारही आमदार या दोन पक्षाचे आहेत. असे असतानाही येथे महापालिका आयुक्त नेमताना वेळकाढूपणा का केला जात आहे असा सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत. या संबंधी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयतत्न केला असता कोणीही प्रतिक्रिया देण्यास पुढे आले नाही.