जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : भिवंडी, शहापूर शहरात उभ्या राहिलेल्या गोदामांमुळे ठाणे-नाशिक महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होत असते. कोंडीची ही अवकळा दूर करता यावी यासाठी पडघ्यापासून थेट ठाण्याच्या दिशेने महामार्गाला समांतर असा ३० किलोमीटर अंतराचा नवा उन्नत मार्ग उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या स्तरावर सुरू झाल्या आहेत. या उन्नत मार्गामुळे कल्याण, डोंबिवली- ठाणे हा प्रवासही वेगाने करता येणार आहे.

मागील दोन दशकांहून अधिक काळापासून भिवंडी आणि आसपासच्या भागात मोठया संख्येने अधिकृत आणि बेकायदा गोदामे उभी राहिली आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपन्यांची सर्वाधिक गोदामे या भागात सुरू आहेत. त्यामुळे ठाणे-नाशिक महामार्गावर नेहमीच अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे एकेकाळी वेगवान वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेला ठाणे-नाशिक महामार्ग तसेच कल्याण-डोंबिवली-ठाणे हा प्रवासही आता कोंडीचा आणि वेळखाऊ ठरू लागला आहे. 

हेही वाचा >>> डोंबिवलीत कुंभारखाणपाडा खाडीत चिमकुलीसह वडील बुडाले, अग्निशमन दलासह पोलिसांकडून शोधकार्य सुरू

उन्नत मार्ग कसा असेल ?

दरवर्षी पावसाळय़ात खड्डय़ांमुळे ठाणे-नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यंतरी या मार्गाची पाहणी करत महामार्गाला समांतर असा एखादा उन्नत मार्ग उभा करता येईल का यासंबंधी चाचपणी करण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले होते. एमएमआरडीएने यासंबंधी सर्वकक्ष असा परिवहन अभ्यास नुकताच पूर्ण केला आहे. भिवंडीतील पडघा ते ठाणे असा ३० किलोमीटर अंतराचा उन्नत मार्ग उभारण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. या मार्गाची रचना कशी असावी तसेच यासाठी येणारा खर्चाचा अभ्यास करण्याचा निर्णय प्राधिकरणामार्फत घेण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या नागरीकरणाचा मोठा वेग असलेल्या शहरांना वाहतुकीसाठी नवा पर्याय उपलब्ध व्हावा आणि मुंबई-नाशिक महामार्गावरील गर्दी कमी व्हावी यासाठी पडघ्यापासून ठाण्यापर्यंत थेट उन्नत मार्ग असावा, असा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. या संपूर्ण पट्टय़ातील भविष्यातील विकासाचा वेग लक्षात घेता अशा प्रकारचा उन्नत मार्ग भिवंडीतील लॉजिस्टिक पार्क, या भागात उभी राहाणारी विकास केंद्रे तसेच ठाणे-कल्याण या शहरातील वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा दुवा ठरेल. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Story img Loader