मुंबईतील अंधेरी-दहिसर मार्गावर मेट्रो मार्गासाठी निधी उभारण्यासाठी यापूर्वी आखण्यात आलेल्या काही मार्गाचा पुन्हा अवलंब करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार या मार्गावरील मेट्रो मार्गिकांच्या दोन्ही बाजूस ५०० मीटर अंतरापर्यंत येणाऱ्या जमिनीवर अधिमूल्य आकारून अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याची तरतूद विकास नियंत्रण नियमावलीत करण्याचा प्रस्ताव आहे. मेट्रो मार्गाच्या आसपास मोठय़ा गृहप्रकल्पांची उभारणी होणार हे स्पष्टच असल्याने या मार्गालगत मोकळ्या जमिनीवर अतिरिक्त चटईक्षेत्र देण्याचा प्रस्ताव आहे. या माध्यमातून वसूल होणाऱ्या अधिमूल्याचा ५० टक्के वाटा मुंबई महापालिकेस तर उर्वरित वाटा मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही अशा प्रकारे अधिमूल्यासहित वाढीव चटईक्षेत्र देण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे, अशी माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. ठाण्याच्या मेट्रो मार्गालगत घोडबंदरचा अपवाद वगळला तर फारशी मोकळी जागा नाही. त्यामुळे तेथे हा पर्याय लागू होऊ शकतो का, याची चाचपणी केली जात आहे. मात्र बिल्डरांच्या बांधकाम प्रकल्पांना आकारल्या जाणाऱ्या विकास शुल्कात तब्बल दुप्पट म्हणजे १०० टक्के वाढीचा प्रस्ताव असून मुंबईसह ठाण्यातही तो लागू होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात मेट्रो मार्गालगत असलेल्या मालमत्तांच्या विक्री किंवा देणगीसाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढीचा प्रस्तावही या ‘समर्पित नागरी परिवहन निधी’अंतर्गत तयार केला आहे.
वाढीव चटईक्षेत्र, मुद्रांक शुल्क वाढीचा पर्याय
मुंबईतील अंधेरी-दहिसर मार्गावर मेट्रो मार्गासाठी निधी उभारण्यासाठी यापूर्वी आखण्यात आलेल्या काही मार्गाचा पुन्हा अवलंब करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
First published on: 01-09-2015 at 04:31 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government to give additional fsi near metro route