ठाण्यात उद्योजकांशी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा संवाद
मेक इन इंडिया यशस्वी करायचे असल्यास त्याआधी मेक इन महाराष्ट्र प्राधान्यक्रमावर असलेच पाहीजे, यामुळेच मेक इन इंडियाचे स्वप्न पुरे होऊ शकेल, असे ठाम मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ठाण्यात व्यक्त केले. ठाण्यात रविवारी कोसिया या लघू उद्योजकांच्या संस्थने आयोजित केलेल्या वेन्डेक्स २०१६ या प्रदर्शनस्थळी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधत असताना ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना देसाई म्हणाले की, इतर देशांमधून राज्यात इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील मोठे उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधांचे जाळेही आपण निर्माण करत आहोत. स्थानिक लघू आणि मध्यम उद्योगांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. उद्योगांच्या सुलभीकरणासाठी अनेक महत्त्वाची पाऊले महाराष्ट्र सरकारने उचलली असून परवानग्याची संख्या ७६ वरुन ३७ वर आणली आहे. ही संख्या २५ पर्यंत लवकरच कमी केली जाईल. महाराष्ट्रात बॉश उद्योगसमूहाच्या सहकार्याने कौशल्यविकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे. तसेच सीडबीच्या सहकार्याने २०० कोटी रुपयापर्यंतचा व्हेंचर फंडही उभा केला जात आहे. यावेळी कोसिया सारख्या लघुउद्योजकांच्या संस्थांनी मोठय़ा प्रमाणावर आपला सहभाग नोंदवावा असेही देसाई म्हणाले.
लघू उद्योजकांच्या सुयोग्य दळणवळणासाठी मुंबई-ठाणे-नाशिक-कल्याण शिळफाटा अशा ठिकाणी नवीन टनेल टाकण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. शिवाय ठाण्यात टिकूजीनीवाडी ते बोरीवली अशा महत्त्वाच्या टनेलचे काम सुरु करण्यात आलेले आहे. तसेच ठाण्यातील लघू उद्योजकांच्या विकासासाठी ठाण्यातच कन्व्हेक्शन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. यावेळी वागळे औद्योगिक वसाहत ही राज्यातील सर्वात प्रथम स्थापन झालेली आशियामधील सर्वात मोठी अशी औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी अनेक मोठे व मध्यम उद्योग असले तरी खरी शक्ती ही लघू उद्योजकांची आहे. त्यांच्यामुळेच विकासाला चालना मिळाली असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Story img Loader