जयेश सामंत

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत दोन वेळा फोनवरुन चर्चा केली. राज ठाकरेंना शनिवारी शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्याच्या उद्देशाने शिंदेंनी हा फोन केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळीच बंडखोरांनी हवं तर मनसेमध्ये जावं असं म्हटल्याने शिंदे गट आणि मनसेमधील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. मात्र शिंदे आणि राज यांचे संबंध यापूर्वीही ठाण्याच्या राजकारणामध्ये चांगलेच चर्चेत राहिल्याचं दिसून आलं आहे. २०१२ मध्ये तर शिंदींनी राज ठाकरेंकडे महापौर निवडणुकीमध्ये पाठिंबा मागताना, “खरं तर आम्ही तुमच्यासोबतच आहोत,” असंही म्हटल्याचं सांगितलं जातं.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

२०१२ च्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसेच्या सात मतांना फार महत्व प्राप्त झालं होतं. शिवसेनेचे ५२ नगरसेवक निवडून आले होते आणि बहुमताचा आकडा हा ६१ चा होता. शिवसेनेला बहुमतापर्यंत पोहचता आलं नव्हतं. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी होती ठाण्यात. नजीब मुल्ला हे आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार होते. शिवसेनेकडून हरिशचंद्र पाटील उमेदवार होते. यावेळेच्या सत्तासंघर्षामध्ये अपक्ष आणि मनसेला सोबत घेऊन बहुमत मिळवण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरु होते. त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं.

नक्की पाहा >> Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

शिवसेना आणि मनसेचा टोकाचा संघर्ष त्यावेळी सुरु असल्याने राज आघाडीच्या बाजूने जातील असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यामुळे नजीब मुल्लांची दावेदारी प्रबळ मानली जात होती. त्याच काळामध्ये नौपाड्यामधील भाजपाच्या एक नगरसेविका गायब झाल्या होत्या. त्यामुळे युतीमध्येही फूट पडली होती. म्हणूनच राज ठाकरेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य

त्यावेळी ठाण्यातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यामध्ये एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे यांचा समावेश होता. यावेळी या आमदारांनी राज यांनी पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. तुम्हीही आमचे नेतेच आहात. आम्ही तुम्हालाही आमचे नेतेच मानतो. तुम्हीही बाळासाहेबांचे वारसदार आहात, अशाही चर्चा त्यावेळी या नेत्यांमध्ये झाल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राज यांचं मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांना असं म्हणाले होते की, “खरं तर आम्ही तुमच्यासोबतच आहोत.”

नक्की वाचा >> शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना फोन करुन सांगतायत…; मुंबईच्या माजी महापौरांचा मोठा दावा

विशेष म्हणजे यावेळेस तिन्ही आमदारांनी उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली नव्हती. म्हणूनच या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे काहीसे नाराज होते. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक फुटले. त्यामुळे मनसेची मदत घेण्याची गरज शिवसेनेला पडली नाही. अपक्ष आणि काँग्रेसमधील बंडाळीच्या आधारे शिवसेनेनं बहुमताचं गणित जळवून घेतलं. दरम्यानच्या काळात याच कारणामुळे झालेल्या शिंदे आणि राज यांच्या भेटी आणि शिंदेंनी सत्तेसाठी केलेला पाठिंब्याचा पाठपुरवठा नेहमी ठाण्याच्या राजकारणामध्ये चर्चेत राहिलेलं आहे. तेव्हापासूनच राज आणि एकनाथ शिंदेंचे फार जवळचे संबंध राहिलेले आहेत. मध्यंतरी राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली तेव्हा त्यांनी प्रामुख्याने एकनाथ शिंदेंवर टीका करणं टाळलं.