ठाणे – महाराष्ट्राच्या राजकारणात एक धक्कादायक घडामोड घडली आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला असून त्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याच्या चर्चा रंगत आहे. या चर्चेनंतर आता, ठाण्याच्या शिवसेना उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर ‘महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी दोघांनी एकत्र यावे’ अशा आशयाचे पोस्ट प्रसारित केल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्ट सध्या समाजमाध्यमांवर चांगल्याच चर्चेत आहेत.

काही दिवसांपूर्वी सिने अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, माझ्यातील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद हे महाराष्ट्र हितापुढे किरकोळ असून ते कधीही मिटू शकतात. राज ठाकरे यांच्या या वक्त्व्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर, मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या पार पडलेल्या मेळाव्यात उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्राच्या हिताकरिता किरकोळ वाद बाजूला ठेऊन एकत्र येण्यास तयार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे बंधु एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

ठाकरे बंधु खरंच एकत्र येतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, अनेकांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. उबाठा पक्षाचे जे जुने शिवसैनिक आहे, त्यांनी देखील ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी आशा व्यक्त केली आहे.

त्यातच, ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील लोकमान्य- सावरकरनगर परिसराचे शिवसेना उबाठा गटाचे विभागप्रमुख राजीव शिरोडकर यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर ‘महाराष्ट्रासाठी व मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या समस्त ठाणेकरांची इच्छा’ अशा आशयाचे पोस्टर प्रसारित केले आहे. ज्यामध्ये हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित असलेले छायाचित्र आणि दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित असलेल्या छायाचित्राचा समावेश आहे. राजीव शिरोडकर यांची ही पोस्ट चांगलीच वायरल होत असून आता खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.