शहरी भागातून प्रदुषणकारी जीन्स धुलाई कारखान्यांना हद्दपार केल्यानंतर या कारखान्यांनी ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणी आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे शहरी भागात धुलाईमुळे होणारे प्रदुषण कमी झाले असले तरी ग्रामीण भागात मात्र हे कारखाने बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे समोर आले होते. अखेर अंबरनाथ तहसिलदार यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासोबत राबवलेल्या संयुक्त कारवाईत सहा गावांतील नऊ ठिकाणचे कारखाने उध्वस्त केले आहेत. या धडक कारवाईने जीन्स धुलाई कारखानदारांचे धाबे दणालले असले तरी या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होते आहे.
हेही वाचा >>> धुलीवंदनाच्या दिवशी मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या ५० मद्यपींवर कल्याण-डोंबिवलीत कारवाई
उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या गटारगंगा होण्याला येथील जीन्स धुलाई कारखाने असल्याचे मानले गेले होते. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने उल्हासनगर शहरातील जीन्स धुलाई कारखाने हद्दपार केले. त्यानंतरही काही काळ छुप्या पद्धतीने हे कारखाने सुरूच होते. उल्हासनगर कारवाई होत असल्याने कालांतराने हे कारखाने अंबरनाथ शहराच्या हद्दीत तसेच बदलापुरात स्थलांतरीत झाले. उल्हास नदी किनारीही हे कारखाने अधूनमधून सुरू होते. अंबरनाथ तालुक्याच्या विविध भागात तसेच कल्याण आणि अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर हे जीन्स धुलाई कारखाने सुरू असल्याचे दिसून आले होते. रात्रीच्या वेळी धुलाई करून या जीन्स औद्योगिक क्षेत्रात उघड्यावर, मोठ्या आणि कमी वर्दळीच्या रस्त्यावर सुकायला ठेवल्या जात होत्या.
हेही वाचा >>> कल्याणमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची सात लाखाची ऑनलाईन व्यवहारातून फसवणूक
धुलाईच्या ठिकाणी खड्डा खोदून त्याचे पाणी जमिनीत मुरवले जात होते. याप्रकरणी तक्रारी वाढल्यानंतर कारवाई केली जात होती. ग्रामीण भागातील भुगर्भातील पाणी दुषईत होण्याची भीती वाढली होती. अखेर बुधवारी अंबरनाथ तहसिलदार प्रशांती माने यांच्या पथकाने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने तालुक्यातील विविध गावांमध्ये कारवाई केली. मौजे चिंचपाडा, वसार, खरड, उसाटणे, कुंभार्ली आणि करवले या सहा गावांतील नऊ जीन्स धुलाई कारखान्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अंबरनाथच्या तहसिलदार प्रशांती माने यांनी दिली आहे. या कारवाईचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले असले तरी या कारवाई सातत्याने करण्याची मागणी होते आहे.