महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कल्याण डोंबिवली पालिकेला नोटीस

कल्याण : कल्याणमध्ये विहीर दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका प्रशासनावर निष्काळजीचा ठपका ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या १५ दिवसांत शहरात मलनिस्सारण उदंचन केंद्राच्या उभारणीसंबंधी आराखडे सादर करावेत, अन्यथा कारवाईस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशी नोटीस नियंत्रण मंडळाने महापालिकेला बजावली आहे.

कल्याण पूर्वेतील विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहिरीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते. परिसरातील नागरी वस्त्यांतील सांडपाणी गटारातून विहिरीत जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. विहिरीत कचरा, सांडपाणी जाऊन मिथेन, हायड्रोजन सल्फाईड, कार्बन मोनोक्साईड असे विषारी वायू तयार झाले होते. त्यामुळे विहीर स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास  यंत्रणांनी काढला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने या घटनेची उशिरा का होईना दखल घेतली. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी. बी. पाटील यांनी वालधुनी नदी प्रदूषणासंबंधी ‘वनशक्ती’ सामाजिक संस्था तसेच इतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच राष्ट्रीय हरित लवादापुढे दाखल केलेल्या याचिकांचा हवाला दिला आहे.

पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी मलउदंचन केंद्राच्या उभारणी संबंधी वेळोवेळी न्यायालयापुढे प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. मात्र कारवाई झालेली नाही. कोकण विभागीय आयुक्तांच्या देखरेखीखाली उदंचन केंद्र उभारणी किती अवधीत पूर्ण करण्यात येईल, पालिका हद्दीतील सांडपाण्यावर योग्यरितीने प्रक्रिया करून मगच ते खाडीत सोडण्यात येईल हे महापालिकेने स्पष्ट केले होते.

राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या हद्दीत रोज तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उदंचन केंद्र उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी ‘अमृत’ योजनेतून निधी दिला आहे. असे असताना विहीर दुर्घटनेत सांडपाण्यामुळे तयार झालेल्या विषारी वायूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला. पालिकेने न्यायालय, शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन केले नाही. सांडपाणी संकलन आणि त्यावरील प्रक्रियेसाठी आवश्यक उपाययोजना वेळेत केल्या नाहीत. यामुळे पर्यावरण संवर्धन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाकडून झाले आहे, असा ठपका नोटिसीमध्ये ठेवण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत पालिकेला मंडळाला उत्तर द्यायचे आहे.

प्रदूषित विहिरीजवळील बंदिस्त नाला बांधण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. परिसरातील कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानग्या दिल्या आहेत. या कंपन्यांनी त्यांचे सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे यासाठी मुदत मागितली आहे. सांडपाण्यामुळे अशी दुर्घटना होऊ नये यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मंडळाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही केली जात आहे.

-गोविंद बोडके, आयुक्त, कल्याण डोंबिवली पालिका