अंबरनाथः प्रदुषणामुळे गटारगंगा झालेली वालधुनी नदी आणि सांडपाण्यामुळे जलपर्णीच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीच्या प्रदुषणमुक्तीसाठी नव्याने कृती आराखडा तयार करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निरी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या प्रदुषणमुक्तीच्या मोहिमेतील ६५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. नागरी सांडपाणी जलस्त्रोतांमध्ये जाण्यापासून रोखण्यात अपयश आल्याने नदी प्रदुषण वाढल्याचेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा पडल्याचे समोर आले आहे. मात्र हे काही पहिल्यांदा झाले असे नाही. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पावसाळ्यानंतर उल्हास नदीत जलपर्णी जमा होत असून यामुळे संपूर्ण नदीच गायब झाल्याचे चित्र दिसते. या जलपर्णीमुळे पाण्याची पातळी खालावले. जून २०१६ मध्ये एका पित्यानेच आपल्या मुलीला उल्हास नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सुदैवाने त्यावेळी जलपर्णीची दाट चादर नदीवर असल्याने ती मुलगी वरचेवर तरंगली होती. यंदाही अशाच प्रकारे जलपर्णीचा विळखा उल्हास नदीत आला आहे. तर प्रदुषणामुळे वालधुनी नदीचा रंगही दररोज बदलतो आहे.

स्थानिक उल्हासनगर महापालिका प्रशासनाने नदी स्वच्छता अभियानाची सुरूवात केली आहे. मात्र दोन्ही नद्यांच्या प्रदुषणमुक्तीसाठी नुकतीच राज्याच्या नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता यांच्या उपस्थितीत एक विशेष बैठक पार पडली. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. यावेळी नदी प्रदुषणाबाबत झालेल्या चर्चेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांवरही चर्चा झाली. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि निरी संस्थांनी मिळून प्रदुषणमुक्तीसाठी २५ मुद्द्यांची नियमावली तयार केली होती, याबाबत बैठकीत माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे या २५ मुद्द्यांच्या नियमावलीतील सुमारे ६५ टक्के अंमलबजावणीही झाल्याची माहिती प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अवघे ३५ टक्के काम शिल्लक असतानाही नद्यांच्या प्रदुषणात घट होताना का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्याचवेळी आता नव्या कृती आराखड्याचेही काम सुरू करण्यात आले असून येत्या पर्यावरण दिनी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मंडळाने नेमके काय केले

बदलापूर, अंबरनाथ शहरातील औद्योगिक वसाहतींमधून निघणारे सांडपाणी प्रक्रिया केल्यानंतर नदी, नाल्यांमध्ये जात होते. मात्र हे सांडपाणी थेट खाडीपर्यंत नेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी थेट वाहिनी टाकण्यात आली आहे. सुमारे १७.५ किलोमीटर लांबीची ही वाहिनी थेट कल्याण खाडीपर्यंत जाते. त्यामुळे या पाण्याचा जलस्त्रोतांमध्ये होणारा विसर्ग थांबला आहे. त्याचवेळी नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील नागरी सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी केंद्रांच्या उभारणीचे आदेश होते. मात्र त्यातील सर्वच पालिकांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू नाहीत. काही पालिकांना दोन ते तीन प्रकल्प सुरू करावे लागणार आहेत. मात्र काही ठिकाणी हे प्रकल्प कार्यान्वित आहेत. नद्यांमध्ये आणि प्रमुख नाल्यांमधे फेकला जाणारा कचरा ही मोठी समस्या होती. ते रोखण्यासाठी काही नदी, नाल्यांवर जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र तेही काम पूर्ण झालेले नाही.