धोकादायक इमारतीमुळे बेघर होण्याची भीती
प्रशासकीय दुर्लक्ष, गलथानपणा आणि भ्रष्टाचाराचा फटका येथील एस.टी. यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना बसला असून धोकादायक ठरलेल्या इमारतीमुळे त्यांच्यावर आता बेघर होण्याची आफत कोसळली आहे. कोणतीही धोकादायक इमारत खाली करताना त्या कुटुंबीयांना तात्पुरता निवारा देणे क्रमप्राप्त असताना तशी कोणतीही तजवीज न करता येथील २० कुटुंबांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्या या कुटुंबांनी महापालिका आयुक्त तसेच एस.टी. महामंडळाकडे तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, असे आवाहन केले आहे.
खोपट एस.टी. स्थानकाजवळ ठाणे विभागातील यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. तिथे २० कुटुंबे राहतात. १९९० मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या डागडुजीबाबत प्रशासनाकडून सातत्याने हलगर्जी करण्यात आली. २००८ मध्ये इमारतीला गिलावा (प्लास्टर) देण्याच्या कामात खूप दिरंगाई झाली. पूर्वीचे प्लास्टर काढून टाकल्यानंतर ठेकेदार आणि प्रशासनाच्या वादात काम अर्धवट राहिले. त्यामुळे भिंतींमध्ये पाणी मुरून इमारत धोकदायक झाली. अशा रीतीने प्रशासकीय दिरंगाईमुळे इमारत धोकादायक ठरली, त्याची शिक्षा आम्हाला का, असा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा सवाल आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अत्यल्प वेतनात मालकी तत्त्वावर सोडा, भाडय़ाने राहण्याची जागा मिळणेही ठाण्यात शक्य नाही. त्यामुळे इमारत खाली करण्यापूर्वी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, त्या काळात इमारतीची पुनर्बाधणी करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. प्रत्यक्षात बजाविण्यात आलेल्या नोटिसीमध्ये प्रशासनाने इमारतीच्या पुनर्बाधणीसंदर्भात कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही.
धोकादायक इमारतींमध्ये अनधिकृतरीत्या राहणाऱ्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचा विचार करणारे प्रशासन अधिकृतरीत्या राहात असूनही आम्हाला मात्र सापत्नपणाने वागवत आहेत, अशी भावना एस.टी. कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader