बदलापूर: आपल्याला महायुतीच्या एकाही उमेदवाराचा पराभव होऊ द्यायचा नाहीये. जे कुणी नाराज असतील किंवा बंडखोरीच्या भूमिकेत असतील त्यांना मी बघून घेतो. पण तुम्ही महायुतीच्या प्रचाराला लागा, अशा स्पष्ट सूचना ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर भूमिका घेतली असून महायुतीतील नाराज आणि बंडखोर यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत दिल्याचे बोलले जाते आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने अनेक इच्छुकांची गर्दी सर्वच पक्षांमध्ये झाली होती. महायुतीला बंडखोरीची मोठी लागण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकांनी बंडखोरी करत इतर पक्षांमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काहींनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. महायुतीला ठाणे जिल्ह्यात अशाच बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. यामुळे अनेक विद्यमान आमदारांना पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागतो आहे. यामुळे काही जागा धोक्यातही येण्याची शक्यता व्यक्त होते आहे. काही ठिकाणी भाजप आमदाराविरुद्ध शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. यामध्ये मुरबाड, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, नवी मुंबई अशा काही मतदारसंघांचा समावेश आहे. काही मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाली नसली तरी तेथील स्थानिक वरिष्ठ नेतृत्वाने भाजप उमेदवाराच्या विरुद्ध गुप्तपणे आघाडी उघडली आहे. या नेत्यांनी आपल्या माजी नगरसेवकांना विद्यमान उमेदवाराविरुद्ध काम न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र विविध ठिकाणी माजी नगरसेवकांनी त्यास थेट नकार दिल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे नजीब मुल्लांसमोर आव्हान

अशाच काही ज्येष्ठ नगरसेवकांशी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. बदलापुरातील शिवसेनेच्या एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाशी मुख्यमंत्र्यांनी नुकताच संवाद साधून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कामाला लागा, अशा स्पष्ट सूचना दिल्याची माहिती त्या नगरसेवकाने दिली आहे. स्थानिक नेतृत्व महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्ध काम करण्याचे सल्ले देत असून असे सुरू राहिल्यास आम्हाला पक्षाचा राजीनामा देऊन महायुतीच्या उमेदवाराचे काम करावे लागेल, अशी भूमिकाही काही नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कळविण्याची माहिती आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या नगरसेवकांना आश्वस्त केले असून मी नाराज आणि बंडखोरीची भूमिका घेणाऱ्यांना बघून घेतो. तुम्ही कामाला लागा, काही अडचण वाटल्यास मला कळवा असेही सांगितले आहे.

हेही वाचा >>> राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

शिंदे यांच्या या संवादामुळे माजी नगरसेवकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून महायुतीच्या प्रचारासाठी तयार असलेल्या या पदाधिकाऱ्यांना बळ मिळाले आहे. शिंदे आता नाराज आणि बंडखोरीच्या भूमिकेत असलेल्या वरिष्ठ नेतृत्व आणि पदाधिकाऱ्यांबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र महायुतीच्या उमेदवाराच्या विरुद्ध तयार होणाऱ्या शिवसेनेतील आघाड्यांवर थेट मुख्यमंत्र्यांनीच भूमिका घेतल्याने स्थानिक बंडखोर  नेतृत्वाची कोंडी झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena in thane district constituencies zws