ठाणे : निवडणूक प्रचाराने राज्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. प्रचार करण्याची एकही संधी सध्या सोडली जात नाही. असं असतांना उमेदवारांना, नेत्यांना बऱ्या वाईट प्रसंगाना सामोरं जावं लागतं. वरळीत सदा सरणवकर यांना जाब विचारणाऱ्या महिलेचा व्हिडीओ असो, नाहीतर नागपूरातील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी थेट भाजपा कार्यालयात जाऊन केलेला प्रचाराचा व्हिडीओ असो अशा घटनाही यानिमित्ताने बघायला मिळत आहेत. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शुक्रवारी ठाण्यात आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुद्वारामध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय आल्याने सेवकांनी नड्डा यांना निघून जाण्याचा सल्ला देताच, नड्डा यांना तेथून अखेर काढता पाय घ्यावा लागला.
विधानसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार सुरू असून शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या सभा आणि बैठकांचा धडका सुरू आहे. अशाचप्रकारे ठाणे शहराचे उमेदवार संजय केळकर आणि शहरातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे शुक्रवारी ठाण्यात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक आणि विशेष सभा घेतली. यापूर्वी त्यांनी गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने त्यांनी सुरवातीला तीन हात नाका येथील गुरुद्वाराला भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माधवी नाईक, संजय वाघुले हे नेते उपस्थित होते. त्यांनी गुरुद्वारात दर्शन घेतले. त्यांनी थोडा वेळ भेटी गाठी घेतल्या. कीर्तनात सहभाग घेतला. यानंतर त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यामुळे नड्डा हे त्याठिकाणी थांबले होते. परंतु सत्कारासाठी थांबलेले नड्डा आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांमुळे गुरुद्वारात सुरू असलेल्या कीर्तनात व्यत्यय येत होता. यामुळे येथील सेवकांनी त्यांना विनंती करत येथून निघून जा असे सांगितले आणि नड्डा यांना तेथून अखेर काढता पाय घ्यावा लागला.