भगवान मंडलिक
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाण पाडा येथील खाडी किनारी हरितपट्ट्यामधील चार हजार चौरस मीटर जागेत शिव सावली नावाने १० बेकायदा इमारतींचा गृहप्रकल्प उभारणाऱ्या भूमाफियांना ‘महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाने’ (महारेरा) इमारत गृहप्रकल्पाची बनावट कागदपत्रे दाखल करुन ‘महारेरा’कडून बनावट नोंदणी क्रमांक मिळविल्याबद्दल नोटीस बजावली आहे.या नोटिसीला भूमाफियांनी योग्य उत्तर दिले नाहीतर ‘महारेरा’कडून नोंदणी प्रमाणपत्र रद्द करुन भूमाफियांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती ‘महारेरा’च्या एका वरिष्ठ सुत्राने दिली.
हेही वाचा >>>डोंबिवलीत उद्धव ठाकरे समर्थकांचे नववर्षाचे शुभेच्छा देणारे फलक फाडले
कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने कुंभारखाण पाडा भागातील सर्व्हे क्रमांक ७६ हिस्सा क्रमांक १६ व १७ वर नगररचना विभागाने एकाही गृहप्रकल्पाला बांधकाम परवानगी दिली नाही. हा हरितपट्टा असल्याने तेथे बांधकाम परवानगी देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे स्पष्ट केले होते.कुंभारखाणपाडा खाडी किनारी मे. आदित्य इन्फ्राचे मालक प्रफुल्ल मोहन गोरे (३४, रा. २०८, श्री जानकी हरी निवास, फडके रोड, डोंबिवली पूर्व), मे. आदेश बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सचे भागीदार सिध्देश प्रदीप कीर (३५), सिकंदर निळकंठ नंदयाल (३५), कुलदीप रामकिसन चोप्रा (३६ रा. सिताबाई भोईर सोसायटी, गावदेवी मंदिर जवळ, रेतीबंदर क्राॅस रोड, डोंबिवली पश्चिम), मे. निर्माण होम्स कन्स्ट्रक्शनचे मनोज सखाराम भोईर यांच्याकडून १० बेकायदा इमारती उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. ‘लोकसत्ता’ने हे बेकायदा बांधकामांचे प्रकरण उघडकीला आणताच पालिका आयुक्तांच्या आदेशावरुन ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी या बेकायदा इमारतींवर कारवाई केली.
हेही वाचा >>>मुंब्र्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पिण्यायोग्य पाणी देण्याची काँग्रेसची मागणी
कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृह प्रकल्पाची बनावट कागदपत्र मागील दोन वर्षात तयार करण्यात आली. ही कागदपत्रे महारेराच्या संकेतस्थळावर दाखल करुन त्यांच्याकडून जून २०२२ मध्ये भूमाफियांनी महारेराचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. या आधारे शिव सावली प्रकल्पातील घरांची १९ लाख ते २८ लाखापर्यंत विक्री सुरू केली होती.वातावरण शांत होताच पुन्हा हा गृहप्रकल्प उभारणीचा भूमाफियांचा प्रयत्न असल्याची चर्चा डोंबिवलीत आहे.तोडलेल्या इमारती पुन्हा उभ्या करुन तेथे रहिवास निर्माण करण्याची डोंबिवलीत प्रथा असल्याने कुंभारखाण पाडा भागातही हा प्रकार होण्याची शक्यता या भागातील रहिवाशांनी आणि काही विकासकांनी वर्तवली. भावे सभागृहाजवळ, शिवमंदिरा जवळ एक तोडलेली इमारत पुन्हा उभारण्यात आली.
महारेराकडून नोटीस
शिवसावली गृहप्रकल्पाला बनावट कागदपत्रांच्या आधारे महारेराकडून नोंदणी प्रमाणपत्र घेतले असल्याची माहिती महारेरा नियमकांनी समजताच त्यांनी शिवसावली गृह प्रकल्पाच्या सर्व प्रवर्तकांना गृहप्रकल्पाची मूळ कागदपत्रे दाखल करण्याची नोटीस बजावली आहे. ही कागदपत्रे दाखल करण्यास भूमाफिया यशस्वी झाले नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आणि महारेराकडून मिळविलेले नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे महारेरातील वरिष्ठाने सांगितले.
(डोंबिवलीतील कुंभारखाणपाडा येथील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्प.)