अंबरनाथः शिलाहारकालिन शिवमंदिरामुळे महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथमध्ये वर्षानुवर्षे मोठी जत्रा भरत असते. मात्र गेल्या चार दिवसांपासून शहरात कचरा उचलणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. शहराच्या प्रमुख रस्ते, चौकांपासून इमारतींमध्ये चार दिवसांपासून कचरा पडून आहे. शहरात एकीकडे महाशिवरात्रीच्या शुभेच्छांच्या फलकांची गर्दी झाली असताना त्याखाली पडलेल्या कचऱ्याकडे मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरू लागली आहे. पालिका आता स्वतंत्र यंत्रणा लावून कचराकोंडी फोडण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अंबरनाथ शहराच्या पूर्वेला वालधुनी नदीच्या किनारी सुमारे ९६० वर्षे जुने शिलाहारकालीन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरामुळे अंबरनाथ शहराची देशात ओळख आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण केले जाते आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या धर्तीवर या अंबरनाथच्या शिवमंदिराचा परिसर विकसीत केला जातो आहे. बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त शहरातली सर्वात मोठी यात्रा भरणार आहे. मंगळवारपासूनच ही यात्रा सुरू होते. यात्रेची तयारी मंदिर प्रशासन, पोलिसांनी केली असली तरी शहरात पालिका प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत हतबल झाल्याचे चित्र आहे. शहरभर विविध लोकप्रतिनिधींनी महाशिवरात्रीनिमित्त शहरात येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारे फलक लावले असले तरी या भाविकांचे स्वागत शहरातील प्रत्येक चौकात, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळेच होते आहे. शहरात चार दिवसांपासून कचरा वाहून नेणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वेतनावरून संप केला आहे. तर त्यांच्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम काही कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे शहरात कचराकोंडी आणखीच वाढते आहे. हा वाद कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचा आहे. मात्र तरीही पालिका प्रशासन स्वतंत्र यंत्रणा वापरून कचरा उचलण्यास सुरूवात करते आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी दिली आहे. पालिकेच्या यादीवर असलेले कंत्राटी जेसीबी आणि गाड्यांचा वापर करून कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे, अशी माहितीही पराडकर यांनी दिली आहे. मात्र शहरात वाढत जाणाऱ्या कचऱ्याच्या ढिगामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.

राजकीय कुरघोड्यांमधून संप

शहरातील दोन राजकीय गटांच्या वादातून कर्मचाऱ्यांना फुस लावून काम बंद केले जात असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळेच या कचराकोंडीवर उघडपणे कुणी बोलण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे शहरात नागरिकांची कोंडी झाली आहे. इमारतींमधला कचरा उचलला जात असला तरी इमारतींच्या कचराकुंड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे इमारतींमध्ये दुर्गंधी पसरते आहे. मनसेच्या वतीने पालिकेत कचरा फेको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाशिवरात्रीपर्यंत कचराकोंडी फुटते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader