भाईंदरमधील पालिका अधिकारी, भाजप नगरसेविकेचा प्रताप; चौकशीचे आदेश
भाईंदर पूर्वेत एका रस्त्याला देण्यात आलेले महात्मा जोतिबा फुले यांचे नाव बदलून त्याऐवजी खासगी विकासकाचे नाव देण्याचा प्रकार पालिका अधिकारी आणि भाजप नगरसेविकेच्या अंगलट येण्याचे संकेत आहेत. या नामांतरामुळे जोतिबा फुले यांचा अवमान झाला असून, पालिकेचा संबंधित अधिकारी आणि नगरसेविकेवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळ अधिवेशनात केली. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शहरातील विविध रस्त्यांना नावे देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे आला होता. या वेळी भाईंदर पूर्व येथील केबिन रोड या रस्त्याला बांधकाम व्यावसायिक चंदूभाई रावल यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. रावल हे भाजप नगरसेविका मेघना रावल यांचे सासरे असून, त्यांनीच हा प्रस्ताव दिला होता. वास्तविक २००१ मध्ये या रस्त्याला महात्मा जोतिबा फुले हे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार तसा फलकही लावण्यात आला होता. मात्र, नव्या प्रस्तावानुसार शुक्रवारी सायंकाळी या रस्त्याला चंदूभाई रावल या नावाचा फलक लावण्यात आला. महात्मा जोतिबा फुले यांचे नाव काढण्यात आल्याच्या तीव्र प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटल्या. चूक प्रशासनाच्या लक्षात आल्याने रविवारी प्रशासनाने घाईघाईने रावल यांच्या नावाचा फलक हटवून पुन्हा फुले यांच्या नावाचा फलक लावला.