कल्याण : मागील अनेक वर्षाची वीज देयकाची चालू व थकित रक्कम भरणा न करणाऱ्या कल्याण परिमंडळातील पाच हजार ५६४ वीज ग्राहकांच्या घरांचा वीज पुरवठा महावितरणच्या पथकांनी खंडित केला आहे. थकबाकीदार वीज ग्राहकाने थकित संपूर्ण रक्कम भरणा केल्याशिवाय हा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.
वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकाने वीजेचा खांब किंवा अन्य भागातून चोरून वीज घेऊन घराचा वीज पुरवठा सुरू केल्याचे निदर्शनास आले तर त्यांच्यावर फौजदारी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मार्च अखेरपूर्वी थकबाकीदार वीज ग्राहकांंनी आपल्याकडील थकित वीज देयकाची रक्कम भरणा करावी म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी संबंधित ग्राहकांना कळवुनही त्याची दखल थकबाकीदार ग्राहकांनी घेतली नाही. त्यामुळे अशा थकबाकीदार वीज ग्राहकांच्या घरांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरणचे आर्थिक अवलंबित्व वीज देयकांच्या वसुलीवर अवलंबून आहे. त्यामुळे वीज देयक वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. ३१ मार्चपूर्वी थकीत वीज देयक वसुली करण्याकडे कर्मचाऱ्यांचा भर आहे. कल्याण परिमंडळात गेल्या २५ दिवसात पाच हजाराहून अधिक वीज देयक थकबाकीदारांच्या घरांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये कल्याण मंडल एकमध्ये एक हजार २५२, कल्याण मंडल दोनमध्ये एक हजार ७०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कल्याण परिमंडळात विविध वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडून ५३ कोटी रूपयांची वीज देयक थकबाकी रक्कम वसूल होणे अद्याप बाकी आहे. कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यात भरणा करून थकबाकीमुक्त व पुनर्वीज जोडणीची संधी अभय योजनेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या योजनेसाठी आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. ३१ मार्चला वीज थकबाकीदारांसाठीच्या अभय योजनेची मुदत संपत आहे.