कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यालगत दुतर्फा महावितरणच्या विजेचे खांब, भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे आहे. हे विजेचे खांब, जागोजागी असलेल्या भूमिगत वीज वाहिन्यांच्या तारांचा वेट्टोळे अलीकडे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांना अडथळा ठरत आहेत. या वीज वाहिन्यांच्या वेट्टोळया तारांमुळे अनेक ठिकाणी पदपथ अडविले गेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालताना कसरत करावी लागते. या रस्त्यावरील विजेचे खांब महावितरणने हटवावेत, अशी वाहतूक विभागाची मागणी आहे.
गेल्या आठवड्यात मेट्रोच्या ठेकेदाराने रात्रीच्या वेळेत शिळफाटा मानपाडा चौकात संरक्षित पत्रे उभे करून वाहतुकीला अडथळा आणला होता. या अडथळ्यांमुळे शिळफाटा रस्ता पहाटेपासून दिवसभर कोंडीत अडकला होता. ही कोंडी सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी माध्यमांना सांगितले होते, शिळफाटा रस्त्यावरील कोंडीला शिळफाटा रस्त्यालगत महावितरणचे विजेचे खांब जबाबदार आहेत. हे खांब स्थलांतरित करावेत म्हणून वाहतूक विभागाने महावितरणला अनेक वेळा पत्रे दिली आहेत. त्यांना संपर्क करून कळवले आहे. हे खांब स्थलांतरित करण्यासाठी महावितरणला रस्त्यालगत पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे. तरीही महावितरणचे अधिकारी आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, अशी साचेबध्द उत्तरे देतात, असे सांगितले होते.
शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यालगत असलेले महावितरणचे विजेचे खांब स्थलांतरित होणे गरजेचे आहे, अशी प्रवाशांचीही मागणी आहे. महावितरणकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्याने वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शिळफाटा रस्त्यावर मेट्रोची कामे गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहेत. या कामांमुळे शिळफाटा रस्त्याच्या मध्यभागी संरक्षित पत्रे बसविण्यात आले आहेत. रस्त्याची मार्गिका दोन्ही बाजुने अरूंद झाली आहे. या अरूंद जागेत दररोज वाहन कोंडी होत आहे. या कोंडीमुळे वाहन चालक रस्ता सीमारेषा भागातून वाहने चालवितात. या वाहनांना विजेचे खांब अडसर येऊ लागले आहेत.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांंगितले, शिळफाटा रस्त्यावरील १० किमी पट्ट्यातील मेट्रो आणि इतर कामांमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. हे खांंब स्थलांतरित करण्यासाठी एमएमआरडीएने दिलेला प्रस्ताव एप्रिल २०२४ मध्ये १.३ टक्के खांब स्थलांतरित (डीडीएफ) योजनेतून मंजूर करून अंतीम कार्यवाहीसाठी एमएमआरडीएला देण्यात आला आहे. या प्रक्रियांसाठी एमएमआरडीएने कंत्राटदाराची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या कामाच्या अंदाजपत्रकाला महावितरणने मे २०२४ मध्ये मंजुरी दिली आहे. प्राधिकरणाने या कामासाठी अद्याप ठेकेदार नियुक्त केला नाही आणि देखरेख शुल्क महावितरणकडे भरणा केलेले नाही, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.
शिळफाटा रस्त्यालगतचे विजेचे खांब स्थलांतरित करण्याची जबाबदारी एमएमआरडीएच्या विद्युत विभागाची आहे. या कामासाठी महावितरणने आवश्यक मंजुऱ्या प्राधिकरणाला दिल्या आहे. ठेकेदार नियुक्त करणे, देखरेख शुल्क महावितरणकडे भरण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. वीज खांब स्थलांतरणाचे काम महावितरणच्या देखरेखीखाली होईल. या कामासाठी महावितरण प्राधिकरणाकडे पाठपुरावा करत आहे. – दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, महावितरण.