डोंबिवली: डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावात एका ग्रामस्थाने वीजेचे देयक महावितरणकडे भरणा केले नव्हते. महावितरणच्या वीज देयक तपासणी पथकाने या ग्रामस्थाला वीज देयक भरण्यासाठी तगादा लावला होता. तरीही ग्रामस्थ थकीत वीज देयक भरणा करत नव्हता. अखेर पथकाने त्याच्या घराचा वीज पुरवठा खंडीत करताच संबंधित ग्रामस्थाने महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. वीज देयक भरणा न करणाऱ्या ग्रामस्थाचे नाव संतोष एकनाथ पाटील आहे. त्यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी संतोष विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी सांगितले, महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते (३३), विद्युत साहाय्यक रोशनी पाटले, दिगंबर खंडाळकर, केशव मराठे हे साहाय्यक अभियंता चौधरी यांच्या आदेशावरुन वीज देयक थकीत रक्कम वसुल करण्यासाठी निळजे गावात शुक्रवारी सकाळी आले होते. ग्राहकांना समज देऊन त्यांना थकीत रक्कम तातडीने भरण्याची सूचना पथकाकडून केल्या जात होत्या. एकनाथ लडकू पाटील यांच्याकडे मोठ्या रकमेची वीज देयक थकबाकी होती. त्यांना यापूर्वी पथकाने देयक भरणा करा, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी तंबी देण्यात आली होती.

हेही वाचा >>> घोडबंदर मार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल; तुळई बसविण्याचे कामासाठी वाहतूक बदल

एकनाथ पाटील देयक भरण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने महावितरणच्या पथकाने पाटील यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला. त्यावेळी घरातून एकनाथ यांचा मुलगा संतोष याने रागाने बाहेर आला. त्याने तंत्रज्ञ आकाश पराते यांना वीज पुरवठा का खंडीत केला. तो पुन्हा जोडून दे, असे बोलून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या प्रकाराचे मोबाईलमधून दृश्यचित्रीकरण रोशनी पाटले करत होत्या. त्यांनाही संतोष याने शिवीगाळ केली. महावितरणच्या वरिष्ठांना माहिती मिळताच ते निळजे गावात दाखल झाले. त्यांच्या आदेशावरुन संतोष पाटील विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

हेही वाचा >>> डोंबिवलीत रामनगरमधील बालभवनला फेरीवाले, टपऱ्यांचा विळखा

काही महिन्यापूर्वी मलंग पट्ट्यातील काकोळे गावात महावितरणच्या पथकाला थकबाकीदार ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. हिललाईन पोलीस ठाण्यात ग्रामस्थांविरुध्द गुन्हा दाखल आहे. ग्रामीण भागात बहुतांशी वीज ग्राहक जिवंत वीज वाहिनीवर आकडे टाकून, चोरुन वीजेचा वापर करतात. महावितरणचे आर्थिक नुकसान करत असल्याच्या तक्रारी आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahavitaran employees beaten up in nilje village near dombivli ysh